रेल्वे लोकलमध्ये महिलांवर केमिकल अटॅक करणारा भामटा अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2019 14:11 IST2019-01-18T13:34:04+5:302019-01-18T14:11:36+5:30
निर्भया पथकाने आज अंधेरी स्थानकात रंगेहाथ आरोपीला पकडले आहे. या आरोपीने रेल्वे, मेट्रो, मुंबई शहराच्या हद्दीत अनेक गुन्हे केलेले आहेत.

रेल्वे लोकलमध्ये महिलांवर केमिकल अटॅक करणारा भामटा अटकेत
मुंबई : रेल्वेच्या महिला प्रवाशांच्या अंगावर केमिकल टाकणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. निर्भया पथकाने आज अंधेरी स्थानकात रंगेहाथ आरोपीला पकडले आहे. या आरोपीने रेल्वे, मेट्रो, मुंबई शहराच्या हद्दीत अनेक गुन्हे केलेले आहेत. आरोपीचं नावं रणवीर चौधरी (वय २४) असं असून तो मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. दोन वर्षांपूर्वी कामानिमित्त मुंबईत आला आणि लोअर परेल येथील फर्निचरच्या दुकानात काम करत होता. चांदिवलीत मित्रांसोबत रणवीर हा राहायचा. महिलांच्या पार्श्वभागावर विकृती म्हणून फेविक्विक तो फेकत असे. ऑफिसला जाताना आणि सुटताना गर्दीच्या वेळी गर्दीचा फायदा घेऊन तो हे कृत्य करत असे.
भूज एक्स्प्रेसमध्ये सुरतच्या दरियाबाई चौधरी यांच्या हत्याकांडाची घटना ताजी असतानाच, रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांवर केमिकल अटॅक होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी लागोपाठ दोन गुन्हे अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. अशा प्रकारे मुंबईतील अन्य रेल्वे स्थानकांवरही असा प्रकार घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यानुसार, साध्या गणवेशातील पोलीस आरोपीचा शोध घेत होते आणि निर्भया पथक देखील आरोपीचा माग काढत असताना आज रंगेहाथ आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.