लग्नानंतरही विसरले नाहीत पहिलं प्रेम, भिवंडीत युगुलाची गळफास घेऊन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 20:07 IST2018-08-03T20:07:03+5:302018-08-03T20:07:39+5:30
सागर संतोष वाघे (वय - २६) आणि अंकिता मंगेश दिवे (वय २३) अशी मयत प्रेमीयुगुलाची नावे आहेत; दोघांचेही लग्नापूर्वी प्रेमसंबंध होते.

लग्नानंतरही विसरले नाहीत पहिलं प्रेम, भिवंडीत युगुलाची गळफास घेऊन आत्महत्या
ठाणे - लग्नानंतरही पाहिलं प्रेम तसंच होतं आणि त्या प्रेमीयुगुलाचे गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह झाडावर आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील लापबुद्रुक गावानजीक घडली आहे. सागर संतोष वाघे (वय - २६) आणि अंकिता मंगेश दिवे (वय २३) अशी मयत प्रेमीयुगुलाची नावे आहेत. दोघांचेही लग्नापूर्वी प्रेमसंबंध होते.
अंकिता विवाहित असून गेल्या तीन वर्षापासून ती माहेरी राहत होती. तसेच सागरला १ वर्षाचा मुलगा आहे. तर अंकितालाही २ वर्षाचा मुलगा आहे. भिवंडी तालुक्यातील लापबुद्रुक गावच्या हद्दीतील सुकाळापाडा येथे तानसा पाईपलाईनलगतच्या झाडाला साडीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दोघांचेही मृतदेह आढळले. आज सकाळी गावकऱ्यांनी हे भयानक दृश्य पाहिले. त्यानंतर या घटनेची माहिती गावातील पोलीस पाटील व्यंकोजी जाधव यांनी पडघा पोलीस ठाण्यात दिली. माहिती मिळताच पडघा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडी तालुक्यातील पडघा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले आहेत.
या प्रेमीयुगुलाच्या आत्महत्या का केली हे उघड झाले नाही. मात्र, शवविच्छेदन अहवालानंतरच त्यांनी आत्महत्या केली की, त्यांची हत्या करून त्यांना झाडाला लटकवले, याचा उलगडा होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पडघा पोलिसांनी प्राथमिक अपमृत्युची नोंद करून तपास सुरु केला आहे.