बदलापुरात माथाडी संघटनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 05:23 PM2018-10-02T17:23:38+5:302018-10-02T17:23:52+5:30

गेल्या अनेक दिवसांपासून शांत असलेले बदलापूर शहर पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने हादरले. माथाडी कामगार संघटनेचा उपाध्यक्ष जगदीश कुडेकर याच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

The firing on the leader of Mathadi organization | बदलापुरात माथाडी संघटनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार

बदलापुरात माथाडी संघटनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार

Next

बदलापूर: गेल्या अनेक दिवसांपासून शांत असलेले बदलापूर शहर पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने हादरले. माथाडी कामगार संघटनेचा उपाध्यक्ष जगदीश कुडेकर याच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या गोळीबारात कुडेकर बचावला. मात्र, यावेळी एक गोळी हवेत झाडल्याने आसपासचा परिसरातील नागरिकांत एकच खळबळ उडाली.

तीन वर्षांपूर्वीच्या हत्या आणि गोळीबाराच्या प्रकरणानंतर बदलापूर शहरात शांततेचे वातावरण होते. या वातावरणाला मंगळवारी अचानक गालबोट लागले. बदलापूर पश्चिमेतील सानेवाडी भागात  सकाळी दहाच्या सुमारास जगदीश कुडेकर याच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला. शिवसेनाप्रणित हिंदुस्थान माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार सेनेचा उपाध्यक्ष जगदीश कुडेकर सकाळी आपल्या कार्यालयात जात असताना रस्त्यावर दबा धरून बसलेले दोन हेल्मेटधारी बाईकस्वारांनी जगदीश कुडेकर याच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हल्लेखोरांचा हा प्रयत्न फसला. यावेळी जगदीश कुडेकर यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केल्याने ते रमेशवाडीकडे निघून गेले. मात्र, काही सेकंदात ते पुन्हा जगदीश कुडेकर याच्याकडे आले आणि पुन्हा गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळीही पिस्तूलमधून गोळी सुटली नाही. त्यानंतर त्यांनी हवेत गोळीबार करत तेथून पळ काढला. त्यामुळे जगदीश कुडेकर थोडक्यात बचावला. याची माहिती मिळताच बदलापूर पश्चिम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला.

जगदीश कुडेकर हा देखील गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याची माहिती बदलापूर पश्चिमचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक लक्ष्मण सारीपुत्र यांनी दिली आहे. टोळी युध्दातुन हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. गोळीबार करणारे आरोपी हे दुकानातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत की नाही याची माहिती पोलीस घेत आहे. दोघांनीही हेल्मेट घातल्याने त्यांची ओळख पटणे अवघड जात आहे. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: The firing on the leader of Mathadi organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.