बारमधील छम छममुळे पोलिसांची वाढणार डोकेदुखी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2019 17:24 IST2019-01-18T17:06:47+5:302019-01-18T17:24:10+5:30
सर्वोच्च न्यायालयाने डान्सबारवरील बंदी हटवल्याने आता ऑर्केस्ट्रा बारचे रुपांतर देखील डान्सबारमध्ये होणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे मर्यादित पोलिसांचे बळ अपुरं तर पडणारच तसेच त्यांच्यावरील कामाचा ताण देखील वाढणार आहे.

बारमधील छम छममुळे पोलिसांची वाढणार डोकेदुखी
मुंबई - डान्सबारला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्याने पोलिसांची डोकेदुखी ही वाढलेली पहायला मिळणार आहे. शहरातले ६५० डान्सबार बंद झाल्यामुळे डान्सबार आणि बार मालकांनी ऑर्केस्ट्राच्या नावाखाली पळवाट काढत हा डान्सबारच्या छुपा धंदा सुरू ठेवला होता. साधारण ४०० हून अधिक ठिकाणी ऑर्केस्ट्राच्या नावाखाली डान्सबार सुरू होते. सर्वोच्च न्यायालयाने डान्सबारवरील बंदी हटवल्याने आता ऑर्केस्ट्रा बारचे रुपांतर देखील डान्सबारमध्ये होणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे मर्यादित पोलिसांचे बळ अपुरं तर पडणारच तसेच त्यांच्यावरील कामाचा ताण देखील वाढणार आहे.
शहरात वाढत्या गुन्हेगारीला डान्सबार जबाबदार असल्याचे अनेक गुन्ह्यांतून पुढे आले होते. कित्येक संसार या डान्सबारमुळे उद्धवस्त झाले. त्यावेळी माझी गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी डान्सबारवर बंदी घालण्याबाबतचा निर्णय घेतला. त्यावर या डान्सबारवर अनेकांचे पोट अवलंबून असल्याचा कांगावा करत बारमालकांनी कोर्टात धाव घेतली.राज्य सरकारने डान्सबार ऐवजी ऑर्केस्ट्रा बारला परवानगी दिल्यानंतर मालकांनी ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली बहुतांश बारची शटर पून्हा उघडी केली.या बारमध्ये महिला गायिका ठेवण्याची मुभा सरकारने दिली. मात्र, गायिकांऐवजी बारबालांचा सुळसुळाट तिथे ही सुरू झाला. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी या बारमालकांनी बारमध्ये छुप्या खोल्या बनवून पोलीस ज्या वेळी कारवाई करती. त्यावेळी त्या छुप्या खोल्यांमध्ये बारबालांना लपवून पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकायचे. २०१८ मध्ये पोलिसांनी तब्बल ४०० हून अधिक ऑर्केस्ट्रावर कारवाई केली. या कारवाईत सर्व नियम धाब्यावर बसवून ऑर्केस्ट्राला डान्सबारच बनवल्याचे अनेक कारवाईतून उघड झाले आहे.
डान्सबारला पुन्हा मुभा दिल्यामुळे बंद पडलेले डान्स बार आणि त्यात नव्याने परवानग्या दिलेल्या ऑर्केस्ट्रा बारची देखील भर पडली आहे. त्यामुळे शहरात पून्हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन गंभीर गुन्हे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आधीच पोलिसांचे मनुष्यबळ कमी असलेल्या पोलिसांची डोकेदुखी वाढणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.