कार्ती चिदम्बरम यांच्यावर गुन्हा; लाचखोरीचा ठपका, १० ठिकाणी सीबीआयचे छापे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 05:29 AM2022-05-18T05:29:23+5:302022-05-18T05:30:16+5:30

मुंबईतील मित्राच्या कंपनीच्या माध्यमातून हे ५० लाख कार्ती यांना मिळाले. 

crime against karti chidambaram cbi raids in 10 places for bribery | कार्ती चिदम्बरम यांच्यावर गुन्हा; लाचखोरीचा ठपका, १० ठिकाणी सीबीआयचे छापे

कार्ती चिदम्बरम यांच्यावर गुन्हा; लाचखोरीचा ठपका, १० ठिकाणी सीबीआयचे छापे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पंजाबमध्ये वीज प्रकल्प उभा करणाऱ्या चिनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या व्हिसाची मर्यादा संपल्यानंतरही कंपनीला २६३ व्हिसा जारी करण्यासाठी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांचे पुत्र कार्ती चिदम्बरम यांनी मदत केली आणि त्या बदल्यात ५० लाख रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप सीबीआयने केला असून या प्रकरणी कार्ती चिदम्बरम यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. 

माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांनी आपल्या घरी सीबीआयने झडती घेतल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी सीबीआयने कार्ती यांच्या दिल्ली, चेन्नईतील घरांसह मुंबईत तीन ठिकाणी, तर कर्नाटक, पंजाब, ओडिशा येथे प्रत्येकी एका ठिकाणी छापेमारी केली. 

काय आहे प्रकरण?

- मुंबईतील मित्राच्या कंपनीच्या माध्यमातून हे ५० लाख कार्ती यांना मिळाले. 

- उद्योगधंद्यांना लागणाऱ्या चाकू-सुऱ्यांची निर्मिती करणाऱ्या या कंपनीने व्हिसा अथवा तत्सम कोणत्याही प्रकारचे काम करत नसतानाही व्हिसा कामासाठी सल्ला आणि प्रक्रियेचे बोगस इनव्हॉइस सादर करीत त्याद्वारे ५० लाखांची शुल्क आकारणी केली. नंतर हे पैसे कार्ती यांनाच मिळाल्याचा आरोप सीबीआयने केला आहे.

चिदम्बरम यांच्याही घरी झडती

याच आरोपांप्रकरणी सीबीआयच्या पथकाने माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांच्या घरी देखील छापेमारी केल्याची माहिती स्वतः पी. चिदम्बरम यांनी ट्विटद्वारे दिली आहे. 

आता मी मोजणे सोडून दिले आहे

हे इतक्या वेळा होत आहे की, आता मी मोजणे सोडून दिले आहे. सन २०१५ मध्ये दोन वेळा, २०१७ मध्ये एकदा, २०१८ मध्ये पुन्हा दोन वेळा आणि आज, सीबीआयने माझ्या घरी पुन्हा छापेमारी केली आहे. - कार्ती चिदम्बरम

सीबीआयच्या पथकाने माझ्या दिल्ली आणि चेन्नईतील घरांची झडती घेतली. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी मला एफआयआरची प्रत दाखवली. त्यात आरोपी म्हणून माझे नाव कुठेही नाही. झडतीमध्ये अधिकाऱ्यांना काहीही सापडले नाही. त्यांनी काहीही जप्त केलेले नाही. पण या कारवाईची वेळ मात्र लक्षणीय आहे. - पी. चिदम्बरम, माजी केंद्रीय वित्तमंत्री
 

Web Title: crime against karti chidambaram cbi raids in 10 places for bribery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.