६०० ते ७०० रिक्षाचालकांच्या चौकशीनंतर २ वर्षीय मुलाचे अपहरण करणाऱ्या महिलेला बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 20:56 IST2018-11-06T20:56:22+5:302018-11-06T20:56:51+5:30
नालासोपारा पूर्वेकडे ६०० ते ७०० रिक्षाचालकांची सीएसएमटी रेल्वे पोलिसांनी कसून केली असता चोरट्या महिलेचा पोलिसांना शोध लागला असल्याची माहिती सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत बावधनकर यांनी लोकमतशी बोलताना दिली.

६०० ते ७०० रिक्षाचालकांच्या चौकशीनंतर २ वर्षीय मुलाचे अपहरण करणाऱ्या महिलेला बेड्या
मुंबई - दिवा रेल्वे स्थानकालगत असलेल्या झोपडपट्टीत राहणाऱ्या विमल सातदिवे (वय २५) या आपल्या दोन वर्षाच्या सनी नावाच्या मुलासोबत मूळगावी म्हणजेच औरंगाबादला जाण्यासाठी निघाल्या. त्यासाठी विमल या ४ नोव्हेंबर रोजी सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या मेनलाईन सभागृहात पतीची वाट पाहत बसल्या होत्या. बसल्या बसल्या विमल यांना झोप लागल्याने त्याचा फायदा घेत एका अज्ञात स्त्रीने २ वर्षाच्या सनीला घेऊन पलायन केले. यानंतर विमल यांनी सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्यात त्यांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. सीसीटीव्हीच्या आधारे हि अज्ञात महिला नालासोपारा पूर्व येथे गेल्याची माहिती रेल्वे पोलिसांना प्राप्त झाली. त्यानंतर नालासोपारा पूर्वेकडे ६०० ते ७०० रिक्षाचालकांची सीएसएमटी रेल्वे पोलिसांनी कसून केली असता चोरट्या महिलेचा पोलिसांना शोध लागला असल्याची माहिती सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत बावधनकर यांनी लोकमतशी बोलताना दिली.
आरोपी महिलेचे नाव पार्वतीदेवी रामछबीला विश्वकर्मा (वय ४०) असं असून ती नालासोपारा येथील तुळींज रोड येथे राहते. विमल यांनी तक्रार दाखल केल्यानंतर सीएसएमटी स्थानकावरील सीसीटीव्ही रेल्वे पोलिसांनी तपासले. त्यानंतर गुन्हे शाखेच्या एका पोलिसाला ही महिला नालासोपारा पूर्व येथे गेली असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सीएसएमटी रेल्वे पोलिसांनी नालासोपारा पूर्वेकडील जवळपास ६०० ते ७०० रिक्षाचालकांची कसून चौकशी केली. त्यानंतर रिक्षाचालक मनोज श्रीवास्तव यांनी आरोपी महिलेला अपहृत मुलासोबत तुळींज परिसरात सोडल्याची महत्वपूर्ण माहिती दिली. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी तुळींज पोलिसांच्या मदतीने आरोपी महिला पार्वती रामछबीला विश्वकर्मा हिला अटक केली.