तब्बल सहा महिन्यांनंतर बलात्कार उघड, पॉक्सोच्या गुन्ह्यात आरोपीला बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 17:25 IST2019-03-16T17:22:11+5:302019-03-16T17:25:49+5:30
बलात्कार करणाऱ्या नराधमाला समतानगर पोलिसांनी गुरुवारी अटक केली.

तब्बल सहा महिन्यांनंतर बलात्कार उघड, पॉक्सोच्या गुन्ह्यात आरोपीला बेड्या
मुंबई - जेवण बनविण्याच्या बहाण्याने घरी बोलावून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला समतानगर पोलिसांनी गुरुवारी अटक केली. ही मुलगी सहा महिन्यांची गरोदर असल्याचे घरच्यांना समजल्यानंतर ही बाब उघड झाली.
अमित रॉय उर्फ बमबम (२३) असे अटक तरुणाचे नाव असून कांदिवली पूर्वच्या पोईसरमध्ये तो राहतो. १३ वर्षांची पीडित मुलगी शोभा (नावात बदल) हीदेखील त्याच परिसरात राहते. रॉयने गोड बोलून तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर ‘मला भाजी बनवून दे, मला तुझ्या हातची भाजी आवडते,’ असे सांगत तो तिला घरी बोलवायचा. याच दरम्यान त्याने अनेकदा तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तिला दिवस गेले. शोभाच्या पोटात अचानक दुखू लागल्याने तिच्या घरच्यांनी तिला डॉक्टरकडे नेले. तेव्हा ती सहा महिन्यांची गरोदर असल्याचे उघड झाले.
शोभा अल्पवयीन असल्याने रुग्णालयाने याची माहिती समतानगर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोभाचा आणि घरच्यांचा जबाब नोंदवला. तेव्हा तिने रॉयबाबत सांगितले. त्यानुसार रॉयला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. तर शोभावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.