८४ कोटींची ‘केबीसी’ची मालमत्ता ईडीकडून जप्त; राज्यभरात २०० कोटींचा केला अपहार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 12:49 PM2024-03-22T12:49:50+5:302024-03-22T12:50:36+5:30

कंपनीशी निगडित ११ ठिकाणी छापेमारी

84 crore assets of 'KBC' seized by ED; 200 crore embezzled across the state | ८४ कोटींची ‘केबीसी’ची मालमत्ता ईडीकडून जप्त; राज्यभरात २०० कोटींचा केला अपहार

८४ कोटींची ‘केबीसी’ची मालमत्ता ईडीकडून जप्त; राज्यभरात २०० कोटींचा केला अपहार

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मल्टिलेव्हल मार्केटिंगची योजना सादर करत राज्यभरातील लाखो गुंतवणूकदारांकडून २०० कोटींपेक्षा जास्त पैसे गोळा करत त्याचा अपहार करणाऱ्या केबीसी मल्टिट्रेड या कंपनीला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दणका देत कंपनीची ८४ कोटी २४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. जप्त केलेल्या मालमत्तेत ठाणे, पाली, नाशिक व सिंधुदुर्ग येथील चल व अचल मालमत्तेचा समावेश आहे. 

प्राप्त माहितीनुसार, कंपनीने क्लब व रिसॉर्टसाठी गुंतवणुकीच्या आकर्षक योजना सादर करत त्यावर भरीव परतावा देणे तसेच या योजनांचा प्रसार करत नवा गुंतवणूकदार आणल्यास त्यावर भरघोस कमिशन देणे आदी कार्यपद्धतीचा अवलंब करत कोट्यवधींची माया गोळा केली होती. मात्र, कालांतराने लोकांना फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सर्वप्रथम परभणीत गुन्हा दाखल झाला. त्यानंतर अनेक जिल्ह्यांत कंपनीचे प्रवर्तक बापू चव्हाण, भाऊसाहेब चव्हाण आणि आरती भाऊसाहेब चव्हाण यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाले. मात्र, मनी लाँड्रिंग झाल्यामुळे तपास ईडीने सुरू केला होता.

कंपनीशी निगडित ११ ठिकाणी छापेमारी

  • ईडीच्या अधिकाऱ्यांनी ८ व ११ मार्च रोजी कंपनीशी निगडित ११ ठिकाणी छापेमारी केली होती.
  • याच छापेमारी दरम्यान ११ मार्च रोजी संजय पंचारिया नावाच्या व्यक्तीच्या नावे आनंद नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित या पतसंस्थेत असलेल्या लॉकरमध्ये असलेली ६२ कोटी रुपये मूल्यांची २० मालमत्तांची कागदपत्रे, १६ कोटी ६० लाख रुपयांची रक्कम, डिमॅट खात्यात असलेले ४४ लाख ६१ हजार रुपये, पोस्ट बचत योजनेतील ५ लाख ५६ हजार रुपये, ३० लाख ७५ हजार रुपये मूल्याचे सोन्याचे व हिऱ्याचे दागिने आदी मालमत्ता जप्त केली होती.
  • कंपनीच्या प्रवर्तकांनी अपहार केलेल्या पैशांतून व्यक्तिगत मालमत्ता खरेदी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

Web Title: 84 crore assets of 'KBC' seized by ED; 200 crore embezzled across the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.