छत्रपती संभाजीनगरचे नवे ‘कलेक्टर’ कोण? सिंगला, स्वामी, विसपुते यांच्या नावांची चर्चा

By विकास राऊत | Published: February 6, 2024 12:19 PM2024-02-06T12:19:26+5:302024-02-06T12:20:14+5:30

सध्या जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय प्रशासकीय प्रशिक्षणासाठी मसुरीला गेले आहेत.

Who is the new 'Collector' of Chhatrapati Sambhajinagar? Discussion of the names of IAS Dipaka Singhla, Dilip Swami, Bhagyshri Vispute | छत्रपती संभाजीनगरचे नवे ‘कलेक्टर’ कोण? सिंगला, स्वामी, विसपुते यांच्या नावांची चर्चा

छत्रपती संभाजीनगरचे नवे ‘कलेक्टर’ कोण? सिंगला, स्वामी, विसपुते यांच्या नावांची चर्चा

छत्रपती संभाजीनगर : जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांचा जिल्ह्यात चार वर्षांच्या आसपास कार्यकाळ झाला असून महापालिका आणि जिल्हा प्रशासनातील कार्यकाळाचा विचार करता त्यांची निवडणूक आयोगाच्या नियमांमुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदली अपेक्षित आहे. सध्या पाण्डेय प्रशासकीय प्रशिक्षणासाठी मसुरीला गेले आहेत. त्यांच्या जागेवर बदलून येण्यासाठी एमएमआरडीएचे सहसचिव दीपक सिंघला, सोलापूर जि. प.चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी (सध्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत), सिडकोला मुख्य प्रशासक या पदावर बदली हाेऊनही अद्याप रुजू न झालेल्या भाग्यश्री विसपुते यांच्या नावांची चर्चा आहे.

गेल्या आठवड्यातील राज्यातील १७ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्या यादीमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यांचे नाव नव्हते. त्यानंतर ५ फेब्रुवारी रोजी ७ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये राहुल गुप्ता यांची महावितरण सहव्यवस्थापकीय संचालकपदासाठी बदली केली आहे. दोन दिवसांपूर्वी गुप्ता यांचे नाव शर्यतीत होते. २०१७ च्या बॅचच्या सनदी अधिकारी विसपुते यांची बदली गेल्या आठवड्यात सिडको मुख्य प्रशासकपदी झाली आहे; परंतु त्यांनी अद्याप पदभार घेतलेला नाही. त्यांचे नाव जिल्ह्यातील दोन मंत्र्यांनी लावून धरले असल्याचे समजते.दिलीप स्वामी यांचेही नाव चर्चेत आहे; परंतु त्यांच्या नावावर नेत्यांचे एकमत दिसत नाही. दीपक सिंगला यांनी जलसंधारण आयुक्त म्हणून काम केले आहे. ते थेट आयएएस असून, विसपुते यांच्यापेक्षा सिनिअर आहेत.

दोन मंत्र्यांची इच्छा...
विसपुते यांचे नाव जिल्ह्यातील दोन मंत्र्यांनी लावून धरले असले तरी सिंगला यांचे नाव ज्येष्ठतेमुळे पुढे आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदे गटाच्या समीकरणांचा विचार करून जिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे. सुरुवातीला पाच जणांची नावे होती. त्यातील मनुज जिंदल आणि राहुल गुप्ता यांची नावे मागे पडली. उर्वरित तिघांपैकी कोण बाजी मारणार, याकडे लक्ष आहे.

Web Title: Who is the new 'Collector' of Chhatrapati Sambhajinagar? Discussion of the names of IAS Dipaka Singhla, Dilip Swami, Bhagyshri Vispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.