विहीर खोदताना आढळून आला मौल्यवान रंगीबेरंगी दगडांचा खजिना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 02:55 PM2024-05-06T14:55:41+5:302024-05-06T14:58:45+5:30

साेयगाव तालुक्यातील बनोटी येथील प्रकार, महसूल विभागाने विहीर घेतली ताब्यात

Valuable colored stones found while digging a well; seized by the revenue department | विहीर खोदताना आढळून आला मौल्यवान रंगीबेरंगी दगडांचा खजिना

विहीर खोदताना आढळून आला मौल्यवान रंगीबेरंगी दगडांचा खजिना

घोसला ( छत्रपती संभाजीनगर) : सोयगाव तालुक्यातील बनोटी शिवारात विहिरीचे खोदकाम करताना शनिवारी सायंकाळी ५ वाजता चकाकणारे रंगीबेरंगी दगड(मौल्यवान गौणखनिज) आढळून आले. दरम्यान, विहिरीच्या पोटात लाखो रुपयांचे गौण खनिज असल्याची शक्यता गृहीत धरून महसूल विभागाने तातडीने रात्री विहीर सीलबंद केली. याशिवाय येथे पोलिस बंदोबस्त लावण्यात आला असून केलेल्या पंचनाम्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे.

बनोटी येथील रवींद्र शिवाजी शिंदे यांच्या गट क्र. १६९ मधील शेतात विहीर खोदण्याचे काम सुरू आहे. साधारणत: ५० फुटांपर्यंत विहिरीचे खोदकाम झाल्यानंतर पिवळसर, बदामी रंग असलेले पाणीदार चकाकणारे दगड मजुरांना आढळून आले. परंतु या दगडांचा नेमका प्रकार कोणता याची माहिती नसल्यामुळे शिंदे यांनी याबाबत गांभीर्य घेतले नाही. मात्र दगडांबाबत अजिंठा परिसरात काम करणाऱ्या काही जणांना माहिती मिळताच त्यांनी शिंदे यांच्या विहिरीवर येऊन हे दगड विकत मागितले. मात्र याबाबत महसूल व सोयगाव पोलिसांना माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक सतीश बडे, रज्जाक शेख, श्रीकांत पाटील यांनी विहिरीकडे धाव घेतली. या दगडांचा पंचनामा करण्यात आला असून सापडलेले दगड हे मौल्यवान गौणखनिज असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून रात्री उशिरापर्यंत विहिरीजवळ पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याशिवाय महसूल विभागाने ही विहीर ताब्यात घेत आहे. तसेच दगडांची चोरी होवू नये, यासाठी टँकरने विहिरीत पाणी सोडले आहे.

पोलिस बंदोबस्त तैनात 
विहिरीचा ताबा महसूल विभागाने घेतला आहे. या विहिरीतील रंगीबेरंगी दगडांचा पंचनामा करून अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविला आहे. येथे पोलिस बंदोबस्त तैनात केला असून, ही दगडे सुस्थितीत आहेत.
- मनीषा मेने, तहसीलदार, सोयगाव

Web Title: Valuable colored stones found while digging a well; seized by the revenue department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.