लोटाबहाद्दरांना कचऱ्याच्या गाडीतून शहरभर फिरविले
By Admin | Published: February 5, 2017 11:31 PM2017-02-05T23:31:43+5:302017-02-05T23:32:37+5:30
उमरगा : नगर पालिकेच्या गुडमॉर्निंग पथकाने रविवारी पहाटेच्या सुमारास लोटाबहाद्दरांविरुद्ध अचानक कारवाई मोहीम हाती घेतल्याने अनेकांची धावपळ उडाली़
उमरगा : नगर पालिकेच्या गुडमॉर्निंग पथकाने रविवारी पहाटेच्या सुमारास लोटाबहाद्दरांविरुद्ध अचानक कारवाई मोहीम हाती घेतल्याने अनेकांची धावपळ उडाली़ पथकाने ३१ जणांविरुद्ध कारवाई करून त्यांना घंटागाड्यात बसवून शहरातून फिरविल्याने संताप व्यक्त होत आहे. संबंधितांच्या नातेवाईकांनी सकाळी-सकाळी पोलीस ठाणे गाठून एकच गोंधळ घातल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता़
उमरगा पालिकेकडून गत वर्षभरापासून स्वछ महाराष्ट्र अभियानातंर्गत घरगुती शौचालय योजना राबविण्यात येत आहे़ घरगुती शौचालयाचा वापर करावा, यासाठी पालिकेकडून अभियान हाती घेण्यात आले आहे़ उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर भल्या पहाटे गुडमॉर्निंग पथकाद्वारे दंडात्मक कारवाई केली जात आहे. कारवाईनंतरही अनेकजण उघड्यावर शौचास जात आहेत़ त्यामुळे पालिका प्रशासनाच्या गुडमॉर्निंग पथकाने रविवारी पहाटे शहराच्या विविध भागात उघड्यावर शौचास बसलेल्या ३१ जणांना पकडले़ त्यानंतर त्यांच्या गळ्यात हार घालून घंटागाड्यातून संपूर्ण शहरभर त्यांना फिरवून पोलीस ठाण्यात नेण्यात आले़ या प्रकारामुळे संतापलेल्या संबंधितांच्या नातेवाईकांनी ठाण्यात धाव घेऊन गोंधळ घालण्यास सुरूवात केली़ कारवाई करून सोडणे गरजेचे असताना घंटागाड्यांमधून फिरवून अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप करण्यात आला़ हा घंटागाड्यांमधून फिरविण्याचा प्रकार किंवा कारवाई कोणत्या आधारावर, कोणत्या नियमावर केली असे म्हणत अनेकांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले़ त्यानंतर संबंधितांवर दंडात्मक कारवाई सोडून देण्यात आले़ यावेळी मुख्यधिकारी बाळासाहेब चव्हाण यांच्यासह अधिकारी, कर्मचारी होते़ या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले असून, घंटागाड्यातून फिरविल्याने संताप व्यक्त होत आहे़ (वार्ताहर)