बाजारात ‘थ्री इन वन’ बैलजोडी; अर्ध्या फुटाच्या बैलांनी वेधले लक्ष
By प्रशांत तेलवाडकर | Published: September 14, 2023 04:25 PM2023-09-14T16:25:46+5:302023-09-14T16:26:45+5:30
पोळ्यानिमित्त बाजारात आल्या अर्धा फूट इंचीच्या बैलजोड्या’. ज्याचा ‘थ्री इन वन’ असा वापर केला जाऊ शकतो.chh
छत्रपती संभाजीनगर : वर्षभर शेतामध्ये राबणाऱ्या ‘सर्जा-राजा’ या खिल्लारी जोडीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे ‘पोळा’. गुरुवारी हा सण साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त घरोघरी माती किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या बैलजोडीचे पूजन करण्यात येईल. यंदा नावीन्य म्हणजे चक्क अर्धा फूट उंचीची बैलजोडी बाजारात आली असून महाग असली तरी हौशी लोक खरेदी करीत आहेत. कारण, या जोड्या ‘थ्री इन वन’ आहेत.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, ‘थ्री इन वन’ कसे काय? तर या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या बैलजोड्या अर्धा फूट उंचीच्या आहेत. त्यांची पोळ्याच्या दिवशी पूजा करण्यात येईल व गणेशोत्सवात बैलगाडीच्या देखाव्यासाठी व नंतर वर्षभर ‘शो पीस’ म्हणून वापर केला जाऊ शकतो. यामुळे यास ‘थ्री इन वन’ असे म्हटले आहे.
बैलजोडीची किंमत किती ?
प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या अर्धा फूट उंचीच्या बैलजोडीची किंमत अडीच हजार ते चार हजार रुपये दरम्यान सांगितली जात आहे. त्यावर जसजशी सजावट केली जाते, तसतशी त्याची किंमतही वाढते, असे मूर्तिकार जवळेकर यांनी सांगितले.
हौशींकडून खरेदी
या अडीच हजार ते चार हजार रुपये किमतीच्या ‘सर्जा-राजा’ची बैलजोडी मूर्तिकारांनी तयार केली. पण या विक्री होतील की नाही, अशी पाल त्यांच्या मनात चुकचुकत होती. मात्र हौशी ग्राहकांनी या बैलजोड्या किमतीत घासाघीस न करता खरेदी केल्या. यामुळे पुढील वर्षी १ फूट उंचीच्या बैलजोड्या तयार करण्यात येईल, असेही मूर्तिकारांनी सांगितले.