संपाला नेत्यांचाही पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 12:26 AM2017-10-20T00:26:27+5:302017-10-20T00:26:27+5:30
विविध मागण्यांसाठी सोमवारी मध्यरात्रीपासून एसटी कर्मचा-यांनी सुरु केलेल्या संपावर तोडगा निघालेला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : विविध मागण्यांसाठी सोमवारी मध्यरात्रीपासून एसटी कर्मचा-यांनी सुरु केलेल्या संपावर तोडगा निघालेला नाही. त्यामुळे तिस-या दिवशी गुरुवारी एकही लालपरी धावली नाही. दरम्यान, खाजगी ट्रॅव्हल्स् बस आणि वाहनांचा प्रवाशांना आधार घ्यावा लागला. तीन दिवसातील संपामुळे बीड विभागाला सुमारे सव्वा कोटी रुपयांचा फटका बसला आहे. संपकरी कर्मचा-यांच्या नेत्यांनी भेटी घेऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत सरकारने तातडीने प्रश्न सोडविण्याची मागणी केली.
दरम्यान, वरिष्ठ कार्यालयाच्या निर्देशानुसार कामावर हजर राहण्यासाठी प्रत्येक आगारासमोर नोटीस डकविण्यात आल्या होत्या. तीन दिवसांच्या संपामुळे बीड विभागाचे सुमारे सव्वा कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
वेळप्रसंगी रस्त्यावर उतरु
एसटीचे कर्मचा-यांच्या मागण्या शासनाने मान्य करून त्यांना न्याय द्यावा व लाखो प्रवाशांचे होणारे हाल त्वरित थांबवावे नसता या एसटी कर्मचारी वर्गाच्या हितासाठी काँग्रेस पार्टी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा असा इशारा सरचिटणीस प्रा.टी.पी मुंडे मुंडे यांनी दिला. यावेळी पदाधिकारी सुर्यकांत मुंडे, दत्तात्रय ढवळे, बाबूभाई नंबरदार, प्रा.विजय मुंडे, प्रदीप मुंडे, प्रा.संदीपान मुंडे, राहुल कांदे, मधुकर ढाकणे, शिवा बडे, कामगार नेते रमेश गित्ते, गणपत मुंडे व संघटनेचे सर्व कामगार उपस्थित होते.
माजलगावात गोंधळ
माजलगांव बसस्थानक परिसरात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या वक्तव्यावरून एसटी कर्मचारी संतप्त झाले. एसटीच्या संपाचा फायदा घेत खासगी वाहतुक दारांनी दर वाढवुन मनमानी केल्याच्या तक्रारी आहेत.
संपाला सरकारच जबाबदार
परळी एस.टी कर्मचा-यांच्या संपाकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. तीन दिवसांपासुन होणा-या सर्वसामान्य प्रवाशांच्या त्रासास राज्य सरकारच जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
यावेळी पदाधिकारी अॅड.गोविंद फड, बाजीराव धर्माधिकारी, सुर्यभान मुंडे, वाल्मिक कराड, माणिक फड, सुरेश टाक, मोहन सोळंके, भाऊसाहेब कराड, गोपाळ आंधळे, सय्यद सिराज, दत्ता सावंत, गोविंद मुंडे, विजय भोयटे आदी उपस्थित होते.