‘गुम है किसी के प्यार में...’; ‘व्हॅलेंटाइन डे’निमित्त 'युनिक गिफ्ट' देण्याकडे प्रेमीजणांचा कल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 06:35 PM2024-02-14T18:35:00+5:302024-02-14T18:36:08+5:30

सध्या 'व्हॅलेंटाइन वीक' सुरू आहे. यानिमित्ताने बाजारातील दुकाने सजली आहेत.

‘Gum hai kisi ke pyar mein...’; Lovers tend to give 'unique gifts' on Valentine's Day | ‘गुम है किसी के प्यार में...’; ‘व्हॅलेंटाइन डे’निमित्त 'युनिक गिफ्ट' देण्याकडे प्रेमीजणांचा कल

‘गुम है किसी के प्यार में...’; ‘व्हॅलेंटाइन डे’निमित्त 'युनिक गिफ्ट' देण्याकडे प्रेमीजणांचा कल

- पूजा येवला/ आर्या राऊत
छत्रपती संभाजीनगर :
‘गुम है किसी के प्यार में, ये दिल सुबह शाम...’ असे प्रेमळ सूर छेडत अनेक प्रेमीजण, युगुल आपल्या स्नेहांकितांसाठी काय भेटवस्तू घ्यावी, या विचारात बाजारात फिरताना दिसत होते. लाल गुलाबांसह, लाल रंगाची वस्त्रप्रावरणे, टेडिबीअर्स नव्हे, तर भेटवस्तूंनाही आकर्षक लाल पॅकिंग दिसत असून, सजलेल्या बाजारात सध्या लाली पसरल्याचे दिसते आहे.

सध्या 'व्हॅलेंटाइन वीक' सुरू आहे. यानिमित्ताने बाजारातील दुकाने सजली आहेत. व्हॅलेंटाइन डे निमित्त कपड्यांच्या दुकानात खासकरून लाल रंगाचे कपडे दर्शनी भागात लावले आहेत. तरुणांनी आपल्या प्रियकर प्रेयसीकरिता गिफ्ट घेण्यासाठी बाजारात गर्दी केलेली दिसून आली. यावर्षी रोझ डेला प्रेमाचं प्रतीक लाल गुलाबाचा ट्रेंड बदलत आर्टिफिशियल गुलाबाचा ट्रेंड दिसून आला. नवीन पॅकेजिंग, विविध फ्लेव्हरसह चॉकलेट आणि १०० रुपयांपासून ते ७ हजार रुपयांपर्यंतचे टेडी खरेदी केले गेले.

व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने बाजारात कस्टमाइज गिफ्टचा ट्रेंड दिसून आला. ज्यात कपल रिंग, कपल वॉच, कपल कॉफी मग, कपल शोपिस अशा गिफ्टला तरुणांकडून सर्वाधिक पसंती आहे. याव्यतिरिक्त लव मीटर, परफ्यूम, लव लेटर, हार्ट पिलो, ग्रीटिंग आदी वस्तूंचीदेखील खरेदी तरुणांनी केली आहे. रेस्टॉरंट, कॅफेमध्ये लाल रंगाचे फुगे, गुलाबाच्या फुलांची सजावट करण्यात आली आहे. अनेक कॅफेमध्ये प्री बुकिंग केलेली दिसून आली.

यावर्षी कमी प्रतिसाद 
दरवर्षीपेक्षा तुलनेने यावर्षी फूल खरेदीस कमी प्रतिसाद होता. बाजार, उद्यानात दिसणाऱ्या मुला-मुलींचे प्रमाणही घटले आहे. रोझ डे आणि व्हॅलेंटाइन डे हे दोन दिवस आमच्यासाठी महत्त्वाचे असतात. त्यामुळे इतर दिवसांपेक्षा अधिक विक्री होते.
- अमोल शिंदे, फूल विक्रेते

उपयोगी भेटवस्तू देण्यावर अधिक भर
यावर्षी तरुण सोशल मीडियावर शुभेच्छा देण्याला पसंती देताहेत. प्रत्यक्ष भेटून हा दिवस साजरा करणाऱ्या अनेक तरुणांचा उपयोगी भेटवस्तू देण्यावर अधिक भर आहे. जसं की वॉलेट, घड्याळ, ब्रेसलेट, ईअरफोन आदी.
- संगीता मालपुरे, गिफ्ट विक्रेते

Web Title: ‘Gum hai kisi ke pyar mein...’; Lovers tend to give 'unique gifts' on Valentine's Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.