गुढीपाडव्याला बाजारपेठेत कोटींचे उड्डाणे; हजार घरांचे बुकिंग, ५०० कार, २००० दुचाकींची विक्री

By साहेबराव हिवराळे | Published: April 10, 2024 05:40 PM2024-04-10T17:40:54+5:302024-04-10T17:44:51+5:30

विवाहकार्याच्या खरेदीसाठी शहर आणि खेड्यांतून आलेल्या मंडळीने सोनेखरेदीवर भर दिलेला दिसला.

Crores spends to Gudipadwaya market; Booking of thousand houses, sale of 500 cars, 2000 bikes | गुढीपाडव्याला बाजारपेठेत कोटींचे उड्डाणे; हजार घरांचे बुकिंग, ५०० कार, २००० दुचाकींची विक्री

गुढीपाडव्याला बाजारपेठेत कोटींचे उड्डाणे; हजार घरांचे बुकिंग, ५०० कार, २००० दुचाकींची विक्री

छत्रपती संभाजीनगर : साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्याला नवीन खरेदी करून शहरवासीयांनी मुहूर्ताचे सोने केले. जवळपास हजार नवीन घरांचे बुकिंग झाले; तर ५०० कुटुंबांनी नवीन घरात प्रवेश केला. ५०० नवीन कार, दोन हजार दुचाकी रस्त्यांवर उतरल्या, सोन्याच्या भावाने विक्रम मोडला; पण उलाढालीत फटका बसला. कुलरपेक्षा एसीला पसंती अधिक मिळाली. मराठी नववर्षाच्या पहिल्या दिवशी शहरवासीयांनी बाजारपेठेत कोटीचे उड्डाण केले.

विवाहकार्याच्या खरेदीसाठी शहर आणि खेड्यांतून आलेल्या मंडळीने सोनेखरेदीवर भर दिलेला दिसला. गुढीपाडव्याला सोन्याचा भाव प्रतितोळा ७२,८०० पर्यंत वर गेला. त्यामुळे ग्राहकी घटली असली तरी काहींनी सणाला खरेदीचा मुहूर्त टळू दिलेला नाही. सोमवारपेक्षा मंगळवारी सोन्याच्या भावात ८०० रुपयांनी वाढ झाली होती. चांदी खरेदीकडे कानाडोळा केला असला तरी चांदीलासुद्धा एका किलोसाठी ८४,५०० मोजावे लागले. सोमवारच्या दरापेक्षा हजार रुपयांनी चांदी महागली होती.

भाववाढीमुळे हात आखडता
यंदा सायंकाळपर्यंत सराफा बाजाराची उलाढाल १२ ते १५ कोटींची झाल्याचा अंदाज आहे. सणाचा मुहूर्त म्हणून खरेदी करणाऱ्यांनी मात्र भाववाढीमुळे थोडा आखडता हात घेतल्याने दरवर्षीपेक्षा २५ टक्के ग्राहकी घटली.
- राजेंद्र मंडलिक, सराफा व्यावसायिक

५०० कुटुंबीयांनी केला गृहप्रवेश
पाडव्याच्या मुहूर्तावर जवळपास हजार नवीन घरांचे बुकिंग झाले; तर ५०० कुटुंबांनी नवीन घरात प्रवेश केला. कुटुंबाच्या आवडीनिवडी पाहून आपल्या आवडीच्या परिसरांत अनेकांनी घरे घेऊन गुढीपाडव्याला घराचे स्वप्न पूर्ण केले.

नवीन घरांचे बुकिंग 
जवळपास हजार नवीन घरांचे बुकिंग झाली आहे. १५०० ते १६०० कोटींची उलाढाल गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर झाली आहे.
- विकास चौधरी (अध्यक्ष, क्रेडाई)

इलेक्ट्रिक वाहनाला पसंती
गुढीपाडव्याला बाजारपेठेत नवी २ हजार पेट्रोल, ई-बाइक वाहने रस्त्यावर आली असून, त्यात ४०० वाहनधारकांंनी ई- बाइकला पसंती दिली. इंधन वाहनात १०० सीसी व १२५ सीसीलाच दुचाकीस्वारांची अधिक पसंती दिसली. विद्यार्थिनींचा स्कूटीकडे कल होता. सकाळी शोरूमवर गर्दी होती आणि सायंकाळी तर गर्दीचा उच्चांक होता. ९० हजारांपासून ते एक लाख १० हजारांपर्यंतची वाहने खरेदीदार घेत होते. दोन हजार दुचाकी रस्त्यावर आल्या असल्या तरी त्यातील ४०० ई-वाहनांचा त्यात समावेश असून, ही उलाढाल जवळपास २०० कोटींची असल्याचे दुचाकी विक्रेता हेमंत खिंवसरा यांनी सांगितले.

चारचाकीत ७५० कोटींची उलाढाल
नव्या ५०० कार रस्त्यावर आल्या. यात पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी आणि ई-व्ही कारही खरेदी करण्यास वाहनधारकांनी पसंती दर्शविली. कार खरेदीतून जवळपास ७५० कोटींची उलाढाल सायंकाळपर्यंत झाली होती.

- सचिन मुळे, कार वितरक

मोबाइल व टीव्ही खरेदी जोरात
मोबाइलमध्ये ५ जी मोबाइल, तसेच आय फोन व ॲडव्हान्स फिचर्स असणाऱ्या मोबाइलकडे ग्राहकांचा कल दिसला. बेसिक फोनही घेणाऱ्यांत मात्र, तोच उत्साह होता. कारण बॅटरी जास्त वेळ टिकणे, संपर्कासाठी चांगला पर्याय म्हणून हे फोन घेण्यावर सामान्य ग्राहकांचा भर दिसला. मोबाइल खरेदीवर सकाळी आणि सायंकाळी दुकानावर गर्दी होती. गतवर्षीपेेक्षा यंदा मोबाइल खरेदी जोरात झाली. ४ कोटींपर्यंत उलाढाल झाली असावी.
- ज्ञानेश्वरअप्पा खरडे (मोबाइल वितरक)

मोठ्या टीव्ही आणि एसीला पसंती...
घरात मोठे टीव्ही आणि एसीला ग्राहकांनी पसंती दिली असून, फ्रीज, होम अप्लायसेंसच्या खरेदीकडे अधिक लक्ष केंद्रित केले आहे. उन्हाळ्यात पाण्याची समस्या अधिक जटिल होणार असल्याने कूलरपेक्षा एसी घेेण्यावर भर दिसला. टीव्हीत विविध नवीन फिचर्स आलेले असून, ५५, ६५ आणि ७५ इंची टीव्हीस शहरवासीयांनी पसंती दिली. वायफाय व इतर फिचर्स त्यात कनेक्ट केलेेले असल्याने त्याकडे अधिक कल दिसत आहे. फॅनही आता नवीन रिमोटवर असून, रेग्युलेटर लावण्याची गरज राहिलेली नाही.
- अरूण जाधव, इलेक्ट्राॅनिक्स विक्रेता

Web Title: Crores spends to Gudipadwaya market; Booking of thousand houses, sale of 500 cars, 2000 bikes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.