बिस्किटाची हॅपी हॅपी फसवणूक ; अतिरीक्तच्या नावाखाली कंपनीकडून ग्राहकांची दिशाभूल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2017 12:49 AM2017-12-23T00:49:34+5:302017-12-23T11:37:41+5:30

पारले कंपनीच्या हॅप्पी हॅप्पी नावाच्या बिस्किटाच्या १० रुपयांच्या पुड्यावर २५ टक्के अतिरिक्त बिस्किटे सध्या दिली जात आहेत. मात्र, यात प्रत्यक्षातही ग्राहकांची कंपनीकडून मोठी दिशाभूल केली जात आहे.

 Biscuits Happy Happy Cheats | बिस्किटाची हॅपी हॅपी फसवणूक ; अतिरीक्तच्या नावाखाली कंपनीकडून ग्राहकांची दिशाभूल

बिस्किटाची हॅपी हॅपी फसवणूक ; अतिरीक्तच्या नावाखाली कंपनीकडून ग्राहकांची दिशाभूल

googlenewsNext
ठळक मुद्देपारले कंपनीच्या हॅप्पी हॅप्पी नावाच्या बिस्किटाच्या १० रुपयांच्या पुड्यावर २५ टक्के अतिरिक्त बिस्किटे सध्या दिली जात आहेत. ४० ग्रॅमचा पुडा ५ रुपयांत, तर १० रुपयांत ८० ग्रॅम बिस्किटे कंपनीने देणे अपेक्षित आहे. त्यावर २५ टक्के अतिरिक्त म्हणजे १०० ग्रॅमचा पुडा दिला पाहिजे; पण प्रत्यक्षात ८८ ग्रॅमच बिस्किटे ग्राहकांना मिळत आहेत.

- प्रशांत तेलवाडकर 

औरंगाबाद : पारले कंपनीच्या हॅप्पी हॅप्पी नावाच्या बिस्किटाच्या १० रुपयांच्या पुड्यावर २५ टक्के अतिरिक्त बिस्किटे सध्या दिली जात आहेत. मात्र, यात प्रत्यक्षातही ग्राहकांची कंपनीकडून मोठी दिशाभूल केली जात आहे. कारण, ४० ग्रॅमचा पुडा ५ रुपयांत, तर १० रुपयांत ८० ग्रॅम बिस्किटे कंपनीने देणे अपेक्षित आहे. त्यावर २५ टक्के अतिरिक्त म्हणजे १०० ग्रॅमचा पुडा दिला पाहिजे; पण प्रत्यक्षात ८८ ग्रॅमच बिस्किटे ग्राहकांना मिळत आहेत. उल्लेखनीय म्हणजे, कायद्याचे पालन करूनच कंपनी ग्राहकराजाची हॅप्पी हॅप्पी दिशाभूल करीत असल्याचे समोर आले आहे. हे एक उदाहरण असून, अनेक कंपन्या काही कंझ्युमर प्रॉडक्टमध्येही अशाच प्रकारचा ‘घोळ’ घालत असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे.

हॅप्पी हॅप्पी बिस्किटासंदर्भात दोन ग्राहकांनी लोकमतकडे तक्रार केली होती. यावरून आमच्या प्रतिनिधीने किराणा दुकानात जाऊन त्या बिस्किटपुड्याचे इलेक्ट्रॉनिक्स काट्यावर वजन करून सत्यता पडतळणी केली. ५ रुपयांच्या हॅप्पी हॅप्पी बिस्किटाच्या पुड्याचे वजन ४० ग्रॅम भरले, तर १० रुपयांच्या पुड्याचे वजन ८८ ग्रॅम भरले. म्हणजे ८ ग्रॅम बिस्टिक अधिक देण्यात आले आहे. मात्र, कंपनीने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी पुड्यावर २५ टक्के अतिरिक्त असल्याचे छापले. येथेच ग्राहकांची दिशाभूल झाल्याचे समोर आले. कारण, सर्वसामान्यांच्या मनात ८० ग्रॅमवर २५ टक्के अतिरिक्त बिस्किट मिळणार अशीच आशा निर्माण होते. मात्र, प्रत्यक्षात १० रुपयांत ८८ ग्रॅमचा पुडा हातात सोपविला जात आहे. यात आणखी घोळ म्हणजे पुड्यावर बारीक अक्षरात छापण्यात आले आहे की, ६५ ग्रॅमवर व २० ग्रॅम एक्स्ट्रा अर्थात ८५ ग्रॅम पुड्याचे वजन असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

एकीकडे मोठ्या अक्षरात २५ टक्के अतिरिक्त छापायचे आणि दुसरीकडे २० ग्रॅम अतिरिक्त लिहायचे. अशी एकंदरीत अपारदर्शकता स्पष्ट दिसून आली. यावर कहर म्हणजे वैधमापनशास्त्राच्या आधीन राहून कंपनीने ही चाल खेळली आहे. कायदानुसार १० रुपयांपर्यंतच्या उत्पादनाचा ‘व्हॅल्यू बेस पॅकेज’मध्ये समावेश होतो. यात वजनावर कोणतेचे बंधन नसल्याचे सत्य समोर आले. म्हणजेच कंपनी कायद्याचे पालन करीत अशा प्रकारची ग्राहकराजाची ‘हॅप्पी हॅप्पी’ दिशाभूल करीत आहे, हे सिद्ध होते.

कंपनीकडून नाही मिळाले समाधानकारक उत्तर
अ‍ॅड. हेमंत कपाडिया यांनी पारले बिस्किटाच्या पुड्यावर छापलेल्या कंपनीच्या तक्रार निवारण केंद्रातील नंबरवर फोन केला असता समोरील व्यक्ती समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. १० रुपयांच्या पुड्यावर प्रिंटिंग व पॅकिंगचा खर्च वाढत असतो, असे उत्तर मिळाले. यावर कपाडिया म्हणाले की, ५ रुपयांचे दोन पुडे घेतल्यावर प्रिंटिंग व पॅकिंगचा खर्च अधिक लागतो. त्या तुलनेत १० रुपयांच्या एकाच पुढ्यावर खर्च कमी लागणारच. शिवाय पुड्यावर मोठ्या अक्षरात २५ टक्के अतिरिक्त छापण्यात आले नेमके त्याचा अर्थ काय. २५ टक्के जास्त वजन असाच होत असणार. म्हणजेच ग्राहकाला १०० ग्रॅम बिस्किट मिळणे अपेक्षित होते; पण १२ ग्रॅम बिस्किट कमी मिळत आहे हे कसे, या प्रश्नाचे उत्तर कंपनीच्या कर्मचा-याला देता आले नाही. माझ्याकडे एवढीच माहिती असल्याचे त्याने सांगितले. मात्र, कंपनीच्या वरिष्ठ अधिका-यांचा नंबर देण्यास त्याने नकार दिला.

पुड्यावरील आकडेवारी संभ्रम निर्माण करणारी
बिस्किटाच्या पुड्यावर देण्यात आलेली आकडेवारी संभ्रमीत करणारी आहे. २५ टक्के अतिरिक्त वजन आहे की, २० ग्रॅम हे स्पष्ट झाले नाही. १० रुपयांच्या पुड्याचे वजन ८० ग्रॅम भरायला पाहिजे होते व त्यावर २५ टक्के म्हणजे १०० ग्रॅमचा पुडा ग्राहकांना मिळायला हवा, मग कंपनीने ८८ ग्रॅमच का बिस्किट दिले. यामागे कंपनीचे धोरण काय आहे, हे कळाले नाही. छापलेली आकडेवारी संभ्रम, दिशाभूल करणारीच आहे. -अ‍ॅड. रेखा कपाडिया, माजी सदस्या, ग्राहक मंच

दिशाभूल करणा-यांवर कारवाई होणे अपेक्षित
कंपनीला परवडत नसले तर त्यांनी पुड्यावर २५ टक्के अतिरिक्त बिस्किट छापण्याची गरज नाही. १० रुपयांत जेवढे बिस्किट बसतील तेवढेच ग्राहकाला देणे अपेक्षित आहे. मात्र, कंपन्या स्पर्धेत टिकण्यासाठी किमती स्थिर ठेवून बिस्किटाचे वजन कमी करीत आहे; पण २५ टक्के अतिरिक्त छापले तर तेवढे बिस्किट देणे कंपनीला बंधनकारक आहे. वैधमापनशास्त्राच्या १८८६ च्या अनुचित व्यापार पद्धती कायदाच्या विरोधात हे प्रकरण आहे,अशा कंपन्यांवर दंडात्मक कारवाई होणे अपेक्षित आहे.
- मधुकर वैद्य (अण्णा), मराठवाडा अध्यक्ष, अखिल भारतीय ग्राहक पंचायत

१० रुपयांपर्यंतची उत्पादने ‘व्हॅल्यू बेस पॅकेज’अंतर्गत
वैधमापनशास्त्र अवेष्टीत वस्तू नियम २०११ नियम ५ मधील अनुसूची २ नुसार ‘व्हॅल्यू बेस पॅकेज’अंतर्गत उत्पादक १० रुपयांपर्यंतची उत्पादने कोणत्याही वजनात देऊ शकतात. यात त्या उत्पादनाचे २५ ग्रॅम, ५० ग्रॅम, ६० ग्रॅम, ७५ ग्रॅम, १०० ग्रॅम किती वजन असावे, यावर बंधन नाही. हाच पुडा ११ रुपयांवरील असता तर त्यांना विषम वजनात बिस्किट पुडा देता आला नसता. मध्यंतरीच्या काळात सरकारने ‘व्हॅल्यू बेस पॅकेज’ पद्धत बंद केली होती; पण पुन्हा ही पद्धत लागू करण्यात आली आहे. यासंदर्भात ग्राहकांनी तक्रारीसाठी आमच्या कार्यालयात संपर्क साधावा.

-आर. डी. दराडे, सहायक नियंत्रक, वैधमापनशास्त्र (प्रभारी)

Web Title:  Biscuits Happy Happy Cheats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.