प्रकाश बस्सी यांचे पं.स. सदस्यत्व रद्द; जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणे भोवले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 00:37 IST2018-02-01T00:36:55+5:302018-02-01T00:37:09+5:30

प्रकाश बस्सी यांचे पं.स. सदस्यत्व रद्द; जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणे भोवले!
लोकमत न्यूज नेटवर्क
मोताळा : पंचायत समितीमधील काँग्रेसचे प्रकाश बस्सी यांचे पंचायत समिती सदस्यत्व जिल्हाधिकारी यांनी एका आदेशान्वये रद्द केले आहे. विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. यामुळे राजकीय वतरुळात एकच खळबळ उडाली आहे.
फेब्रुवारी २0१७ मध्ये झालेल्या जि.प. व पं.स.च्या निवडणुकीत काँग्रेसचे प्रकाश बस्सी यांनी बोराखेडी पंचायत समिती गणातून अनुसूचित जमाती या राखीव प्रवर्गातून निवडणूक लढवत जिंकली होती. राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या ४ ऑगस्ट २0१६ च्या शासन निर्णयानुसार व जि.प. व पं.स. अधिनियम १९६१ च्या कलम १२ (अ), ४३ (६),(अ),६७ (७-अ) नुसार राखीव जागेवर निवडून आलेल्या सदस्यांनी सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास त्या व्यक्तीची निवड रद्द करण्यात यावी, अशी तरतूद आहे. प्रकाश गण्यानसिंग बस्सी यांनी जात वैधता प्रमाणपत्र विहित कालावधीत सादर केलेले नाही, असा अहवाल मोताळा तहसीलदारांनी २५ जानेवारी रोजी वरिष्ठांना सादर केला होता. यावरून जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी आपल्या अधिकाराचा वापर करीत प्रकाश बस्सी यांची पं. स. सदस्य म्हणून झालेली निवड रद्द केल्याचा आदेश पारित केला आहे.
ठोके यांचेही सदस्यत्व रद्द
सिंदखेडराजा : येथील पंचायत समिती सदस्य राजेश ठोके यांचेही सदस्यत्व जिल्हाधिकारी यांनी २९ जानेवारी रोजी काढलेल्या एका आदेशान्वये रद्द केले आहे.
राजेश o्रीपत ठोके हे सिंदखेडराजा पंचायत समितीमध्ये सवडद गणामधून राखीव प्रवर्गातून निवडून आले होते; मात्र त्यांनी निर्धारित सहा महिन्यांच्या कालावधीत त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. त्यामुळे त्यांचे पंचायत समिती सदस्यत्व जिल्हाधिकारी यांनी रद्द केले आहे. जिल्ह्यातील जवळपास चार सदस्यांचे सदस्यत्व या कारणामुळे रद्द झाले आहे.