विमानांची घटती संख्या: सुखोईचा विचार करण्यास हरकत नसावी!

By रवी टाले | Published: October 24, 2018 02:57 PM2018-10-24T14:57:52+5:302018-10-24T15:00:40+5:30

सुखोई-३० एमकेआय हे विमान आयएएफचा कणा आहे; परंतु हे विमान भविष्यकालीन गरजा पूर्ण करण्यासाठी सक्षम नसल्याने त्या जातीची आणखी विमाने समाविष्ट करणे हा पर्याय नसल्याचे आयएएफने संरक्षण मंत्रालयास कळविले आहे.

Declining number of aircraft: need to think about Sukhoi! | विमानांची घटती संख्या: सुखोईचा विचार करण्यास हरकत नसावी!

विमानांची घटती संख्या: सुखोईचा विचार करण्यास हरकत नसावी!

googlenewsNext
ठळक मुद्दे सध्याच्या घडीला आयएएफकडे केवळ ३१ स्क्वाड्रन आहेत.मिग-२१ आणि मिग-२७ जातीची १३० विमाने बरीच जुनी झाली असून, ती येत्या काही वर्षात निवृत्त होणार आहेत. घटत असलेली लढाऊ विमानांची संख्या हा आयएएफसाठी चिंतेचा विषय झाला आहे.

भारतीय वायूसेना (आयएएफ) आणि हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) संदर्भात अलीकडे उमटलेल्या दोन बातम्यांनी लक्ष वेधून घेतले आहे. लढाऊ विमानांची संख्या आवश्यकतेपेक्षा बरीच कमी असल्याच्या समस्येवर उतारा म्हणून आणखी सुखोई-३० एमकेआय विमाने सामील करून घेण्यास आयएएफने नकार दिला ही त्यापैकी एक बातमी, तर २७२ सुखोई विमानांची आॅर्डर वर्षभरात पूर्ण केल्यानंतर एचएएलकडे काम असणार नाही, ही दुसरी बातमी! सुखोई-३० एमकेआय हे विमान आयएएफचा कणा आहे; परंतु हे विमान भविष्यकालीन गरजा पूर्ण करण्यासाठी सक्षम नसल्याने त्या जातीची आणखी विमाने समाविष्ट करणे हा पर्याय नसल्याचे आयएएफने संरक्षण मंत्रालयास कळविले आहे.
आयएएफची मंजूर स्क्वाड्रन संख्या ४२ आहे. एका स्क्वाड्रनमध्ये १६ ते १८ विमाने असतात. सध्याच्या घडीला आयएएफकडे केवळ ३१ स्क्वाड्रन आहेत. त्यातच मिग-२१ आणि मिग-२७ जातीची १३० विमाने बरीच जुनी झाली असून, ती येत्या काही वर्षात निवृत्त होणार आहेत. म्हणजे आणखी सुमारे आठ स्क्वाड्रन बाद होणार आहेत. त्याशिवाय ११८ जग्वार आणि ५७ मिराज-२००० विमानेही जुनी झाली आहेत. मिग विमानांची जागा स्वदेशी बनावटीची तेजस विमाने घेणार असली तरी, एचएएलद्वारा तेजसचे उत्पादन खूपच संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे वेगाने घटत असलेली लढाऊ विमानांची संख्या हा आयएएफसाठी चिंतेचा विषय झाला आहे.
नजीकच्या भविष्यात आयएएफमध्ये नव्याने केवळ ३६ राफेल विमाने दाखल होणार आहेत. शिवाय २७२ सुखोई विमानांपैकी उर्वरित ३२ विमाने २०२० पर्यंत दाखल होतील. त्यामुळे आणखी चार स्क्वाड्रनची भर पडणार असली तरी, निवृत्त होणार असलेल्या विमानांमुळे स्क्वाड्रनची संख्या घटणारही आहे. आयएएफने आणखी ११० विमानांच्या खरेदीची प्रक्रिया सुरू केली आहे; मात्र ती विमाने प्रत्यक्षात दाखल होण्यास आणखी किमान पाच-सहा वर्षे तरी लागणार आहेत. तेजस विमानांच्या संथ गतीने सुरू असलेल्या उत्पादनामुळे परिस्थिती आणखीच गंभीर होत आहे.
या पाशर््वभूमीवर आयएएफने आणखी काही सुखोई विमाने दाखल करून घेण्याचा विचार करण्यास हरकत नव्हती. याचा आणखी एक पैलू असा आहे, की आयएएफच्या ताफ्यातील सुमारे ४० विमानांमध्ये हवेतून वार करणारे ब्रह्मोस हे स्वनातित क्रुझ क्षेपणास्त्र बसविण्यात येणार आहे. सुखोईतून ब्रह्मोस डागण्याची चाचणी यशस्वीरित्या पार पडली आहे. प्रत्येक सुखोई विमानात तीन ब्रह्मोस बसविण्यात येणार आहेत; मात्र सध्या सेवेत असलेल्या सुखोई विमानांचा ढाचा त्यासाठी पुरेसा मजबूत नसल्याने, ज्या विमानांमध्ये ब्रह्मोस बसविण्यात येणार आहेत, त्या विमानांमध्ये सुधारणा करावी लागणार आहे. त्याऐवजी आराखड्यात आवश्यक ते बदल करून ब्रह्मोस वाहून नेण्यास सक्षम अशी ४० विमानांचे नव्याने उत्पादन करणे हा अधिक चांगला पर्याय ठरू शकला असता, असे काही तज्ज्ञांचे मत आहे.
एचएएलकडे सुखोई विमानांच्या उत्पादनासाठीची यंत्रणा तयार आहे. एचएएल सध्या वर्षाकाठी १२ सुखोई विमानांचे उत्पादन करीत आहे. एचएएलने सुखोई विमानांची विद्यमान आॅर्डर २०२० मध्ये पूर्ण केल्यानंतर तीन वर्षात ब्रह्मोस वाहून नेण्यात सक्षम अशा सुमारे ४० विमानांचे उत्पादन पूर्ण होऊ शकले असते. त्याचा दुहेरी लाभ असा झाला असता, की आयएएफच्या ताफ्यात आणखी ४० विमानांची भर पडू शकली असती आणि ब्रम्होस वाहून नेण्यासाठी सध्या सेवेत असलेल्या सुखोई विमानांमध्ये सुधारणा करण्याचा खटाटोप करण्याची गरज भासली नसती. एचएएलचे व्यवस्थापकीय संचालक टी सुवर्णा राजू यांनीही असेच मत मांडले आहे. सुखोई भविष्यकालीन गरजा पूर्ण करण्यासाठी सक्षम नसल्याचे आयएएफचे मत अगदी योग्य असले तरी विमानांच्या वेगाने घटत असलेल्या संख्येमुळे भविष्यापेक्षा वर्तमानातच विमानांची कमतरता जाणवणार आहे, ही वस्तुस्थिती लक्षात घेणे गरजेचे आहे.

- रवी टाले

ravi.tale@lokmat.com

 

Web Title: Declining number of aircraft: need to think about Sukhoi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.