जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधूची आगेकूच, उपउपांत्यापूर्व फेरीत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2017 09:06 PM2017-08-22T21:06:23+5:302017-08-22T21:27:10+5:30

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंनी चांगली सुरुवात केली आहे. पहिल्या दिवशी भारताचा स्टार शटलर किदाम्बी श्रीकांतने एकतर्फी झालेल्या सामन्यात रशियाच्या सर्जी सिरांत याचा सरळ दोन गेममध्ये फडशा पाडून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

World Badminton Championship V. Sindhu's winning salute | जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधूची आगेकूच, उपउपांत्यापूर्व फेरीत प्रवेश

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधूची आगेकूच, उपउपांत्यापूर्व फेरीत प्रवेश

Next

नवी दिल्ली, दि. 22 - जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंनी चांगली सुरुवात केली आहे. पहिल्या दिवशी भारताचा स्टार शटलर किदाम्बी श्रीकांतने एकतर्फी झालेल्या सामन्यात रशियाच्या सर्जी सिरांत याचा सरळ दोन गेममध्ये फडशा पाडून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. त्यानंतर आजच्या दिवशी रिओ ऑलिम्पिकची रौप्यविजेती भारतीय स्टार पी. व्ही. सिंधूने किम जोचा पराभव करत विजयी सुरुवात केली आहे. सिंधूने कोरियन प्रतिस्पर्धी किम ह्यो मिनचा 21-16 आणि 21-14 अशा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला.  पहिल्या सामन्यात सिंधूला बाय मिळाला होता. त्यामुळे सिंधूनं आता उपउपांत्यापूर्व फेरीत प्रवेश केला आहे.  पुरुष खेळाडूंमध्ये साई प्रणीतने आपली विजयी सुरुवात केली आहे.

कोरियन प्रतिस्पर्धी किम ह्यो मिन बरोबरच्या पहिल्या सामन्यात सिंधूने एकतर्फी विजय मिळवला. पहिल्याच सेटमध्ये किम ह्यो मिनला बॅकफूटवर ढकलत 8-0 अशी आघाडी घेतली. पहिला सेट एकतर्फी होणार असे वाटत असतानाच किम ह्योनं सामन्यात दमदार पुनरागमन केलं. पण सिंधूला त्याचा फारसा फरक पडला नाही. सिंधूने पहिला सेट 21-16 अशा फरकाने जिंकत सामन्यात आघाडी घेतली. काही सुरेख पॉईंट मिळवत अखेरच्या क्षणात किम ह्यो मिनने सिंधूला चांगली टक्कर दिली. मात्र सिंधूने किमला सामन्यात फारसं डोकं वर काढण्याची संधी न देता पहिला सेट 21-16१६ अशा फरकाने जिंकला.
दुसऱ्या सेटमध्ये सिंधूला पहिल्या मिनीटापासूनच किमने चांगली लढत दिली. पण पहिला सेट जिंकणाऱ्या सिंधूने दुसरा सेटही21-14 अशा फरकाने जिंकत सामना आपल्या खिशात घातला. याव्यतिरीक्त साई प्रणित, समीर वर्मा, तन्वी लाड आणि ऋतुपर्णा दास या भारतीय खेळाडूंनी आपल्या पहिल्या फेरीचे सामने जिंकले आहेत.
यंदा पहिल्यांदाच भारत सुवर्ण पदकाचा दावेदार म्हणून खेळत असून भारताची मदार पुरुष गटात श्रीकांतवर, तर महिला गटात पी. व्ही. सिंधूवर आहे. श्रीकांतने आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवताना सर्जीचा २१-१३, २१-१२ असा ३० मिनिटांहून कमी वेळेत धुव्वा उडवला. सर्वच क्षेत्रात वर्चस्व राखताना श्रीकांतने सर्जीला पुनरागमन करण्याची एकही संधी न देताना बाजी मारली. दुसºया फेरीत श्रीकांतचा सामना फ्रान्सचा लुकास कोर्वी विरुध्द होईल.
स्पेनचा प्रतिस्पर्धी पाब्लो एबियान याने दुखापतीमुळे सामन्यातून माघार घेतल्याने समीरची सहज आगेकूच झाली. ज्यावेळी पाब्लोने माघार घेतली तेव्हा समीर २१-८, १७-४ असा आघाडीवर होता. महिलांमध्ये तन्वीने झुंजार खेळ करताना इंग्लंडच्या क्लो बर्चला १७-२१, २१-१०, २१-१९ असे नमवले. मिश्र दुहेरी गटात सात्विकसैराज रंकिरेड्डी आणि मनीषा के. या जोडीने ताम चुन हेई - एनजी त्सझ याऊ या हाँगकाँगच्या जोडीचा २४-२२, २१-१७ असा पाडाव केला.

 

या स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघावर एक नजर  
पुरुष एकेरी - श्रीकांत किदम्बी, अजय जयराम, बी.साई प्रणीत, समीर वर्मा
महिला एकेरी -  पी.व्ही.सिंधू, सायना नेहवाल, रितुपर्ण दास, तन्वी लाड
पुरुष दुहेरी - मनु अत्री आणि सुमित रेड्डी, सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी, श्लोक रामचंद्रन आणि एम.आर.अर्जुन
महिला दुहेरी - आश्विनी पुनप्पा आणि एन.सिकी रेड्डी, संजना संतोष आणि आर्थी सारा सुनील, मेघना जक्कमपुडी आणि पुर्विशा एस.राम
मिश्र दुहेरी- प्रणव चोप्रा आणि एन.सिकी रेड्डी, बी. सुमित रेड्डी आणि आश्विनी पुनप्पा, सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि के. मनिषा

Web Title: World Badminton Championship V. Sindhu's winning salute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.