Lambrata will come back to India in a fresh new look | नव्या आकर्षक रूपात पुन्हा भारतात येणार लॅम्ब्रेटा

एकेकाळी भारतीय रस्त्यावर धावलेली लॅब्रेटा ही स्कूटर आपल्या विविध वैशिष्ट्यांनी लोकांना आवडलेली होती. आता त्या लॅम्ब्रेटाची तीन नवी रूपे इटलीमधील मोटारसायकल प्रदर्शनात ठेवली गेली होती. युरोपमधील बाजारात पुढील वर्षी उतरवल्यानंतर भारतात २०१९ मध्ये ही स्कूटर सादर केली जाणार आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
लॅम्ब्रेटा ही स्कूटर काही वर्षांपूर्वी लुप्त झाली. एक दणकट व १५० सीसी इंजिन क्षमता असणारी एकेकाळची लॅम्ब्रेटा म्हणजे स्कूटरमधील एक महाराजा असणारीच होती. भारतामध्ये बजाज चेतक येण्यापूर्वी तयार होणारी ही स्कूटर त्यावेळी व्हेस्पाला तोंड देत समर्थपणे भारतीय बाजारपेठेवर वर्चस्व ठेवून होती. अर्थात त्यावेळी फार मोठ्या प्रमाणात दुचाकी वापरल्याही जात नव्हत्या. जितक्या आज वापरल्या जात आहेत. अशा या लॅम्ब्रेटाचे लुप्त होणेही त्यावेळी फार मनाला चटका लावणारे ठरले नाही. याचे कारण त्यावेळी बजाज स्कूटर चांगल्या जोमात होती. आज आॅटोगीयरच्या स्कूटर्सचा जमाना आहे. १२५ सीसी क्षमतेचे कमाल इंजिन ताकद इतकेच या स्कूटर्सचे राज्य सध्या तरी आहे. तरीही महिलांपासून वृद्धापर्यंत सर्वांना स्कूटर चालवणे सोपे बनले आहे. पण काही म्हटले तरी पूर्वीच्या हाताने गीयर टाकण्याच्या स्कूटर्सचे महत्त्व अजूनही जुन्या पद्धतीच्या त्या स्कूटर चालवणा-यांच्या मनातून कमी झालेले नाही. अशातच अलीकडेच व्हेस्पा स्कूटर सादर झाली. पूर्णपणे पत्रा बॉडी असणारी ही स्कूटर आहे. बाकी सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स या ट्युब्युलर चासीच्या आधारे तयार केल्या गेलेल्या आहेत. 
या पार्श्वभूमीवर पुन्हा एकादा एकेकाळी भारतीय रस्त्यावर अधिराज्य गाजवलेली लॅम्ब्रेटा परत भारतात सादर केली जाणार असल्याची चर्चा आहे. इटलीच्या मिलान शहरात ईआयसीएमए मोटारसायकल प्रदर्शनात लॅम्ब्रेटाच्या तीन मॉडेल्सचे दर्शन देण्यात आले, व्ही ५०, व्ही १२५ व व्ही २०० या स्पेशल स्कूटर्सचे सादरीकरण केले गेले. या तीन स्कूटर भारतात सादर केल्या जाण्याची शक्यता असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. १९५० ते १९९० पर्यंत लॅम्ब्रेटाचे उत्पादन केले गेले. ऑटोमोबाइल प्रॉडक्ट्स इंडिया (एपीआय) व स्कूटर इंडिया लिमिटेड या दोन कंपन्यांद्वारे ही लॅ्ब्रेटा त्यावेळी असेम्बल केली जात होती. मात्र गेल्या दोन दशकांमध्ये ती भारतातून लुप्त झाली. आता लवकरच या तीन नव्या मॉडेल्सना घेऊन लॅम्ब्रेटा पुन्हा भारतात येत आहे. नवीन आरेखन जुन्या स्कूटर्सचीही आठवण करून देणारे आहे. ट्युब्युलर चासीबरोबरच पत्र्याचा खुबीने उपयोग केलेली या व्ही ५०, व्ही १२५ व व्ही २०० मॉडेलची बॉडी मजबूत दिसते. (स्टीलबॉडी बेस हेच स्कूटरचे मुक्य व मजबूत लक्षण म्हणावे लागते.) नव्या वेगळ्या लूकमध्ये ही नक्कीच आवडेल खरे पण तिची स्पर्धा नेमकी कोणत्या भारतीय कंपनीशी करावी, असे नक्कीच वाटत नाही. याचे कारण त्यातल्या त्यात या रचनेची तुलना पाहात ती व्हेस्पाच्या सध्याच्या स्कूटर्सबरोबर करता येईल. दर्जेदारपणा आला तरी किंमत व मायलेज या दोन गोष्टी सध्या भारतीय बाजारपेठेतील लक्षवेधी घटक आहेत. लॅम्ब्रेटाच्या व्ही ५०, व्ही १२५ व व्ही २०० या तीन नव्या मॉडेलच्या स्कूटरला फिक्स्ड फेंडर, फ्लेक्ड फेंडर या दोन प्रकारांमध्ये सादर केले गेले आहे.२०१८ च्या सुरुवातील ही मॉडेल युरोपमध्ये पुन्हा आणली जाणार आहेत यामध्ये व्ही ५० हे ४९ सीसी , एअरकूल्ड इंजिन, सिंगल सिलींडर. ७५०० आरपीएम ३.४ बीएचपी, ६५०० आरपीएम ३.४ एनएम टॉर्क या शक्तीची आहे. १२ वॉल्ट चार्जिंग सॉकेटची सुविधाही त्याला देण्यात आलेली आहे. व्ही २०० या मॉडेलला बॉश एबीएस देण्यात आले आहे. साधारण २०१९ पर्यंत ही स्कूटर भारतात सादर केली जाण्याची शक्यता आहे.
अन्य मॉडेलमध्ये  व्ही १२५  ही १२४.७ सीसी , फ्यूएल इंजेक्टेड मोटर,  एअरकूल्ड इंजिन, सिंगल सिलींडर. ८५०० आरपीएम १०.१ बीएचपी, ७००० आरपीएम ९.२ एनएम टॉर्क या शक्तीची आहे.  व्ही २००  ही सर्वात वरच्या ताकदीचे मॉडेल आहे. त्यात १६८.९  सीसी , एअरकूल्ड इंजिन, सिंगल सिलींडर. ७५०० आरपीएम १२.१ बीएचपी, ५५०० आरपीएम १२.५ एनएम टॉर्क या शक्तीची आहे. 
तीनही स्कूटरला ७७० मिमि उंचीची आसनव्यवस्था असून व्हीलबेस १३३० मिमि आहे. तर ६.५ लीटरची इंधन टाकी क्षमता देण्यात आली आहे. तीनही स्कूटर्सचे रुपडे सारखे असून ते नक्कीच आकर्षक वाटावे असेच आहे. भारतात येईल, तेव्हा त्या स्कूटर्सना कसा प्रतिसाद मिळतो, तेच पाहायचे. एक मात्र खरे की एक दमकटपणा मिळालेल्या या स्कूटरला ताकदीप्रमाणे दिलेल्या श्रेण्या पाहिल्या तर नक्कीच स्कूटरप्रेमींना आवडतील, असे तूर्तास तरी वाटते.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.