अफवांचे पेव कधी थांबणार; औरंगाबादेत चोरी आणि अपहरणाच्या संशयावरून दोन युवकांना बेदम मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 16:47 IST2018-06-15T16:47:20+5:302018-06-15T16:47:54+5:30
अफवेतून मध्यप्रदेशातील दोन तरुणांना आज सकाळी पडेगाव येथे बेदम मारहाण करण्यात आली.

अफवांचे पेव कधी थांबणार; औरंगाबादेत चोरी आणि अपहरणाच्या संशयावरून दोन युवकांना बेदम मारहाण
औरंगाबाद : चोरी आणि अपहरणासाठी परराज्यातुन शहरात अनेकजण आले आहेत अशा अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्या फिरत आहेत. या अफवेतूनच मध्यप्रदेशातील दोन तरुणांना आज सकाळी पडेगाव येथे बेदम मारहाण करण्यात आली. विक्रमनाथ लालुनाथ (वय 38) व मोहननाथ भैरवनाथ (वय 35) अशी बेदम मारहाण झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, विक्रमनाथ लालुनाथ व मोहननाथ भैरवनाथ हे दोघे मूळ मध्यप्रदेश येथील आहेत. दोघेही बहुरूपी असून मागील दोन वर्षांपासून ते शहरात राहतात. आज सकाळी ते पडेगाव परिसरातील कासंबरीनगर येथे भिक्षुकीसाठी गेले होते.
मात्र, चोर असल्याच्या संशयाने त्यांच्यावर अचानक जमावाने हल्ला केला. यावेळी जमावाने लाठ्या काठ्यांनी त्यांना मारहाण बेदम मारहाण केली. सकाळी साडे सहापासून ते नऊपर्यंत त्यांना मारहाण सुरु होती. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत त्यांची सुटका केली. यानंतर दोघानांही उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.