नवजात ‘नकोशी’ झाल्याने ‘तो’ पुन्हा चढला बोहल्यावर; विवाहितेला घराबाहेर हाकलले

By प्रदीप भाकरे | Published: February 24, 2023 01:30 PM2023-02-24T13:30:50+5:302023-02-24T13:35:47+5:30

नात नको नातूच हवा म्हणत सासरकडून छळ

Wife kicked out of home as daughter born, husband remarry | नवजात ‘नकोशी’ झाल्याने ‘तो’ पुन्हा चढला बोहल्यावर; विवाहितेला घराबाहेर हाकलले

नवजात ‘नकोशी’ झाल्याने ‘तो’ पुन्हा चढला बोहल्यावर; विवाहितेला घराबाहेर हाकलले

googlenewsNext

अमरावती : पोटची मुलगी ‘नकोशी’ झाल्याने पत्नीला घराबाहेर हाकलून देत एकजण पुन्हा बोहल्यावर चढला. तत्पुर्वी, आम्हाला नात नव्हे, नातूच हवा, असे म्हणत सासरच्या मंडळीने अनन्वित छळ केला, अशी तक्रार एका विवाहितेने स्थानिक फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात नोंदविली. २३ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी याप्रकरणी तिच्या पतीसह सासारच्या मंडळीविरूध्द कौटुंबिक छळाचा गुन्हा नोंदविला.
             
तक्रारीनुसार, काही वर्षांपुर्वी येथील एका तरूणीचे लग्न झाले. सुरूवातीचे काही दिवस आनंदात गेल्यानंतर ऑक्टोबर २०१६ मध्ये सासरच्या मंडळीने तिला माहेरहून पैसे आणण्याकरीता तगादा लावण्यास सुरूवात केली. आपले वडिल गरीब आहेत, ते तुम्हाला पैसे कुठून आणून देणार असे सांगितले असता पतीने तिला मारहाण केली. अनेकदा दारूच्या नशेत देखील पतीने तिच्यावर मर्दुमकी गाजविली. याबाबत तिने सासू सासऱ्यांना सांगितले. मात्र त्यांनी मुलाची बाजू उचलून धरत तुझ्या बापाने काय दिले, ते भिकारी आहेत, असे बजावत तिला त्रास दिला.

दरम्यान सन २०१८ मध्ये प्रसुतीकरीता ती माहेरी आली. तिने गोंडस मुलीला जन्म दिला. आपल्याला मुलगी नव्हे, तर मुलगाच हवा, असे पतीने तिला दरडावले. तर, तुला पहिली मुलगी झाली. तुझे सिझर झाले, आपल्याला नातुच हवा, आम्ही तुला घरात घेत नाही असे म्हणून आरोपी सासरा, सासू हे सुनेला बघायला व घ्यायला सुद्धा आले नाही.

ती नांदायला तयार पण....

प्रसुतीनंतर ती भावासोबत सासरी गेली असता सासरकडील मंडळीने तिला शिवीगाळ करुन मारहाण केली. तुला मुलगी झाल्याने आम्ही तुला घरात घेत नाही, असे बजावून त्यांनी तिला तिच्या नवजात मुलीसह घराबाहेर हाकलून दिले. त्यामुळे दोन महिन्यांपुर्वी तिने शहर पोलीस आयुक्तालयातील महिला सेलमध्ये तक्रार दाखल केली. तर दुसरीकडे आरोपी पतीने तिच्यापासून घटस्फोट घेण्याकरीता न्यायालयात प्रकरण दाखल केले. ते प्रकरण न्यायप्रविष्ठ असुन सुद्धा पतीने दुसरे लग्न केल्याचे विवाहितेला समजले. त्यामुळे आपल्याला पतीसोबत नांदायची इच्छा असताना देखील आरोपींनी शारिरीक व मानसिक त्रास देऊन क्रूर वागणूक दिल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

Web Title: Wife kicked out of home as daughter born, husband remarry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.