धक्कादायक! मटणाची हड्डी गळ्यात अडकून इसमाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2018 20:42 IST2018-10-21T20:41:26+5:302018-10-21T20:42:58+5:30
नंदकिशोर विश्वास तायडे (45,रा.वडाळी) यांच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

धक्कादायक! मटणाची हड्डी गळ्यात अडकून इसमाचा मृत्यू
अमरावती : मांसाहरी जेवणातील मटणाची हड्डी गळ्यात अडकल्याने एका इसमाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी प्रबुद्धनगरात उघडकीस आली. विनोद किसन वाघमारे (40,रा. प्रबुध्दनगर) असे मृताचे नाव आहे. विनोद यांच्या मृत्यूनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नंदकिशोर विश्वास तायडे (45,रा.वडाळी) यांच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. नंदकिशोर यांचा भाचा विनोद हा 19 ऑक्टोबर रोजी कामावरून घरी आला होता. रात्री 8 वाजता जेवण करीत असताना विनोदच्या गळ्यात मटणाची हड्डी अडकली. त्यामुळे त्याची प्रकृती बिघडली. त्याला तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी आणण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी विनोद यांना मृत घोषित केले. विनोदच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून, शवविच्छेदन अहवालानंतर त्यांच्या मृत्युचे निश्चित कारण उघड होईल, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेचा प्राथमिक तपास पोलीस शिपाई विनोद चिखलकर यांनी केला असून पुढील तपास सुरू आहे.