धामणगाव रेल्वे बाजार समितीत प्रचंड भ्रष्टाचार
By Admin | Updated: July 3, 2014 23:18 IST2014-07-03T23:18:42+5:302014-07-03T23:18:42+5:30
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती व सचिवांनी प्रचंड भ्रष्टाचार केल्याचा आरोेप प्रताप अडसड यांनी गुरूवारी आयोजित पत्रकार परिषदेतून केला. अनियमितता, नियमबाह्य कामे,

धामणगाव रेल्वे बाजार समितीत प्रचंड भ्रष्टाचार
धामणगाव रेल्वे : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती व सचिवांनी प्रचंड भ्रष्टाचार केल्याचा आरोेप प्रताप अडसड यांनी गुरूवारी आयोजित पत्रकार परिषदेतून केला. अनियमितता, नियमबाह्य कामे, सभापतींनी मागील तीन वर्षांत ९ लाखांचा प्रवासभत्ता उचलल्याचा आरोपही अडसड यांनी केला. समितीच्या वार्षिक अहवालात ही बाब नमूद आहे़ या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी बाजार समितीचे संचालक प्रताप अडसड, मोहन इंगळे यांच्यासह सहा संचालकांनी पत्रकार परिषदेतून केली.
कृषी उत्पन्न बाजार समितीत अनागोंदी कारभार सुरू असल्याचा आरोप करीत अडसड यांनी सन ११-१२ तसेच सन १२-१३ च्या मूूळ व पुरवणी अर्थसंकल्पामध्ये केलेली तरतूद व शीर्ष लक्षात घेता तसेच बाजार समितीचे वार्षिक अहवालामधील तरतुदी विसंगत आहेत. मंजुरीपेक्षा खर्च अधिक असून बऱ्याच महसुली खर्चाला पणन मंडळाची मंजुरी घेतलेली नाही़ परवानगीशिवाय व बजेटशिवाय बाजार समितीने हा खर्च केला आहे़
बाजार समितीचे सभापती श्रीकांत गावंडे यांनी मागील तीन वर्षांत प्रवासभत्ता व अनामत रक्कम म्हणून ९ लाख ९१ हजार ४५५ रूपयांची उचल केल्याचे तीन वर्षांच्या वार्षिक अहवालात पहायला मिळते़ याबाबत चौकशी झाल्यास सभापतीने केलेला भ्रष्टाचार उघडकीस येऊ शकतो, असे प्रताप अडसड यांचे म्हणणे आहे.
बाजार समितीने सन २०१० पासून तर सन २०१४ या चारही वर्षांत बाजार निधी अनुदान, विकासात्मक दंड, कर्ज, तसेच दैनंदिन खर्च याकरिता चेकद्वारे केलेले व्यवहार व नगदीने केलेले व्यवहार याचे प्रमाण ३०-७० असे आहे. ही बाब वित्तीय लेखा संहितेचे पूर्णत: उल्लंघन करणारी आहे़ ३० एप्रिल २०१४ रोजी बाजार समितीच्या मासिक सभेला संचालक लक्ष्मीनारायण चांडक हजर नसताना या सभेत ठराव क्रमांक दोनमध्ये जमा-खर्चाला सूचक मानून त्यांचे नाव दर्शविण्यात आले आहे. तक्रार जिल्हा उपनिंबधकांकडे केली आहे. चौकशीला सुरूवात झाल्याची माहिती प्रताप अडसड यांनी दिली़ पत्रपरिषदेला संचालक मोहन इंगळे, सुमन धांदे, दिलीप लांबाडे, सूरज परसोने उपस्थित होते.