दहेंद्री येथे तक्रारदाराला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 01:26 AM2018-02-02T01:26:38+5:302018-02-02T01:26:55+5:30
चिखलदरा तालुक्यातील दहेंद्री येथे आमसभेत एका ग्रामस्थाला ग्रामरोजगार सेवकाची तक्रार दिल्याबद्दल त्याची पत्नी व अन्य एका महिलेने मारहाण केल्याची तक्रार काटकुंभ येथील पोलीस चौकीत ३१ जानेवारीला देण्यात आली आहे.
ऑनलाईन लोकमत
चुरणी : चिखलदरा तालुक्यातील दहेंद्री येथे आमसभेत एका ग्रामस्थाला ग्रामरोजगार सेवकाची तक्रार दिल्याबद्दल त्याची पत्नी व अन्य एका महिलेने मारहाण केल्याची तक्रार काटकुंभ येथील पोलीस चौकीत ३१ जानेवारीला देण्यात आली आहे.
दहेंद्री येथे एक महिन्यापूर्वी ग्रामरोजगार सेवक सुकलाल भुता कास्देकर याने महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अकुशल कामावर विद्यार्थ्यांनीनी काम केल्याचे दाखविले होते. यापैकी पूजा सुकलाल कासदेकर, दीपक पोकळे, अक्षय रामाजी सेलुकर हे तिघे १८ वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. वर्षभरापासून हे प्रत्यक्ष कामावर हजर न राहता शालेय शिक्षण घेत आहेत. तरीही त्यांची नावे हजेरी पत्रकावर नमूद मजुरीची देयके काढण्यात आली. गावातील अनिल पुंजू येवले यांनी याबाबत तक्रार निवारण प्राधिकारी (रोहयो) अमरावतीचे देवीदास जवंजाळ यांना तक्रार दिली होती. दरम्यान, चिखलदरा तालुक्यातील दहेंद्री येथे बुधवारी आमसभा झाली. यामध्ये सुकलाल कासदेकरची पत्नी शोभा व कविता पतीराम कासदेकर व अन्य एका महिेलेने ग्रामरोजगार सेवकाची तक्रार दिल्याबद्दल सर्वांसमोर अनिल येवले यांना चपलेने बदडले. त्यांच्या आई व पत्नीलाही मारहाण केली. खोट्या प्रकरणात अडकविण्याची धमकी दिली.काटकुंभ पोलीस चौकीच्या बीट जमादारांनी प्रकरण चौकशीसाठी दाखल करून चिखलदरा पोलीस ठाण्याकडे पाठविले आहे.