ग्रामपंचायतच्या कर वसुलीसाठी पॉस मशीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 12:36 PM2019-08-16T12:36:34+5:302019-08-16T12:37:15+5:30
जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना बँकेकडून पॉस मशीन पुरविण्यात याव्या, त्याद्वारे ग्रामपंचायतींची कर वसुली व इतर आर्थिक व्यवहार करता येणे शक्य होईल.
अकोला : ग्रामपंचायतींमध्ये विविध कराचा भरणा करण्यासाठी तसेच इतरही आर्थिक व्यवहार करण्यासाठी ‘गाव तेथे एटीएम’ उपलब्ध करण्याचे अभियान राबविण्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ठरविले आहे. त्यानुसार या सोयी-सुविधा देण्यात याव्या, असे पत्र जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहे.
जिल्ह्यात ५३५ ग्रामपंचायती आहेत. त्या गावांतील ग्रामस्थांना विविध प्रकारच्या कराचा भरणा करण्यासाठी तसेच इतर आर्थिक व्यवहार करण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत गाव-गाव एटीएम अभियान सुरू करण्याचे ठरविण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींचे सामान्य फंड व पाणी पुरवठा निधीची खाती जिल्हा मध्यवर्ती बँकेत आहेत. त्या खात्यामध्ये ग्रामपंचायतींकडून कराचा भरणा केला जातो; मात्र सध्या सर्व सुविधा आॅनलाइन होत आहेत. नागरिकांना सुविधा पुरविणे प्रशासनाचे काम आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना बँकेकडून पॉस मशीन पुरविण्यात याव्या, त्याद्वारे ग्रामपंचायतींची कर वसुली व इतर आर्थिक व्यवहार करता येणे शक्य होईल.
प्रत्येक गावात नागरिकांना बँकिंग सुविधा उपलब्ध करण्यासाठी मायक्रो एटीएम योजना सुरू करावी, या सर्व सेवा पुरविताना ग्रामपंचायतींकडून होणाºया व्यवहारांचा आॅनलाइन डिस्प्ले करण्यात यावा, त्याद्वारे नागरिकांना ग्रामपंचायतींची आर्थिक स्थिती, व्यवहारांची माहिती मिळणार आहे. जिल्ह्यातील ठरावीक ग्रामपंचायतींमध्ये या उपक्रमाची सुरुवात १५ आॅगस्ट रोजी करण्याचे नियोजन करण्याचेही पत्रात म्हटले आहे.