वातावरणातील बदल ठरताहेत घातक!
By Admin | Updated: July 12, 2017 19:57 IST2017-07-12T19:57:09+5:302017-07-12T19:57:09+5:30
‘सर्वोपचार’मध्ये रुग्णांची संख्या वाढली : ताप, सर्दी, खोकल्याचा प्रादुर्भाव

वातावरणातील बदल ठरताहेत घातक!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : वातावरणात दिवसागणिक होणारे बदल मानवी आरोग्यास अपायकारक ठरत आहेत. पावसाळ्याचे दिवस असतानाही दुपारी तापणारे ऊन आणि सकाळ व सायंकाळी खेळणारी थंड हवा, अशा टोकाच्या वातावरणाचा अनुभव येत असल्यामुळे आजारांचे प्रमाण वाढले असून, सर्वोपचार रुग्णालयासह लहान-मोठ्या दवाखान्यांमध्ये ताप, सर्दी, खोकला या विषाणुजन्य आजारासह जलजन्य आजाराच्या रुग्णांची संख्या वाढली आहे.
गत आठवड्यापासून पावसाची उघडझाप सुरू असल्याने वातावरणात झपाट्याने बदल होत आहे. सुरुवातीला झालेल्या पावसामुळे शहरातील बहुतांश भागात डबके साचले आहे, त्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. पावसाने दडी मारल्याने ऊनदेखील तापत आहे. वातावरणातील या बदलाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर थेट जाणवू लागला आहे. हात-पाय दुखणे, घसा खवखवणे, डोकेदुखी, ताप येणे, सर्दी, खोकला या प्रकारची लक्षणे नागरिकांमध्ये दिसून येत आहेत. सर्वाेपचार रुग्णालयासह शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. ही लक्षणे सामान्य वाटत असली, तरी डेंग्यू, डायरियासह स्वाइन फ्लूचीदेखील प्राथमिक लक्षणे आहेत. त्यामुळे कुठल्याही दुखण्याला साधारण समजून न टाळता डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे घ्या, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
जलजन्य आजार वाढले!
पावसाळ्यात जलस्रोत दूषित होणे ही एक सामान्य बाब आहे. हे दूषित जल पिण्यामुळे जलजन्य आजार बळावले आहेत. सर्वोपचार रुग्णालयात अतिसाराचे अनेक रुग्ण दाखल आहेत. पावसाळ्यात उकळलेले पाणी प्यावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
उघड्यावरील पदार्थ टाळा!
पावसाळ्यात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले असते. अशा वातावरणात उघड्यावर विकल्या जाणारे खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे पोटाचे विकार होण्याची शक्यता अधिक असते. उघड्यावरील पदार्थांवर वातावरणातील रोगजंतू, धूळ बसते, त्यामुळे असे पदार्थ टाळायला हवे.
सर्वोपचार रुग्णालयात दाखल रुग्ण
अतिसार- ३७ रूग्ण
टायफाइड - ०७ रूग्ण
मेनेंजायटीस - ०१ रूग्ण
गॅस्ट्रो - ०६ रूग्ण
ताप - २० रूग्ण