१८ ते ४५ वयोगटातील लाभार्थींचे लसीकरण होणार केवळ दोनच केंद्रांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 09:44 AM2021-05-10T09:44:40+5:302021-05-10T09:45:14+5:30
Corona Vaccination : सोमवारी केवळ दोनच केंद्रांवर लसीकरण होणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
अकोला : जिल्ह्यात १ मेपासून १८ ते ४५ वयोगटातील लाभार्थींच्या लसीकरणाला सुरुवात झाली. नऊ दिवसांतच उपलब्ध लसींचा साठा संपल्याने या वयोगटातील लसीकरणही प्रभावीत झाले असून, सोमवारी केवळ दोनच केंद्रांवर लसीकरण होणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. कोविशिल्ड संपल्याने या दोन्ही केंद्रांवर केवळ कोव्हॅक्सिन उपलब्ध होणार असून, या लसीचाही साठा मर्यादितच उपलब्ध आहे. १८ ते ४५ वयोगटातील लाभार्थींच्या कोविड लसीकरणास सुरुवात होऊन ९ दिवसांचा कालावधी लोटला. या नऊ दिवसांत सुमारे २८ हजार युवकांनी कोविड लस घेतली. लसीसाठी तरुणाईचा ऑनलाइन बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळत असला तरी, रविवारी मात्र अनेकांची निराशा झाली. महापालिका क्षेत्रातील कोविशिल्डचा साठा संपला असून, कोव्हॅक्सिन लसीचेही मर्यादित डोस शिल्लक असल्याने सोमवारी केवळ दोनच केंद्रांवर लसीकरण होणार आहे. त्यासाठी रविवारी सायंकाळी अनेकांना ऑनलाइन बुकिंगची संधी मिळाली नाही. कोव्हॅक्सिनचा साठाही मर्यादित असल्याने येत्या दोन दिवसांत या वयोगटातील लसीकरणही पूर्णत: ठप्प होण्याची शक्यता दिसून येत आहे.
दोन सेकंदात शेड्युल बुक
कोविड लसीकरण मोहिमेंतर्गत कोविन संकेतस्थळावर लसीकरणासाठी ऑनलाइन डोस आरक्षित करण्यासाठी हजारो लाभार्थी एकाच वेळी ऑनलाइन राहतात. त्यामुळे रविवारी सायंकाळी संकेतस्थळावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि कस्तुरबा गांधी रुग्णालयाचे शेड्युल पडताच दोन सेकंदात ते बुक झाल्याचे दिसून आले.