११ लाख ग्रामस्थांची तहान टँकरवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 13:31 IST2019-04-28T13:30:55+5:302019-04-28T13:31:22+5:30
एकीकडे गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना दुसरीकडे ग्रामीण भागात हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांची धडपड सुरू आहे.

११ लाख ग्रामस्थांची तहान टँकरवर!
अहमदनगर : एकीकडे गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना दुसरीकडे ग्रामीण भागात हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांची धडपड सुरू आहे. सद्यस्थितीत टँकरने आत्तापर्यंतचा उच्चांक गाठला असून तब्बल ७३२ टँकरने ११ लाखांहून अधिक लोकांना पाणीपुरवठा केला जात आहे.
यंदाच्या तीव्र दुष्काळात सर्वांचीच लाहीलाही होत असून पाणीटंचाईने नागरिक घायाळ झाले आहेत. भूजलपातळी खालावल्याने गावोगावच्या विहिरी, कूपनलिका कोरड्या पडल्या. पाणी योजनाही बंद पडल्याने पाण्यासाठी भटकंती सुरू झाली.
त्यामुळे जिल्हा प्रशासनाने जानेवारीपासून टँकर सुरू केले.
आजमितीस ४८३ गावे व २ हजार ७२२ वाड्यांमधील सुमारे ११ लाख २६ हजार लोकसंख्येला तब्बल ७३२ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. २०१३च्या दुष्काळी स्थितीत टँकरचा आकडा ७३२ होता. तो आकडाही आता मागे पडला आहे. अजून मे व जून असे दोन महिने जायचे आहेत. त्यामुळे टँकरचा आकडा हजारापर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
माणसी २० लिटर पाणी टँकरद्वारे दिले जाते. तेच पाणी जपून वापरण्याचे आव्हान लोकांपुढे आहे. सुदैवाने जनावरांच्या छावण्या सुरू आहेत. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न मिटला आहे. दुसरीकडे सूर्य आग ओकत असताना पाण्याची मागणी वाढली आहे. प्रशासनाने आणखी खेपा वाढवून द्याव्यात, अशी मागणीही होत आहे.
सर्वाधिक १५२ टँकर पाथर्डी तालुक्यात सुरू असून त्यानंतर पारनेर (१३७), शेवगाव (५९), संगमनेर (५३) येथेही टँकरची संख्या अधिक आहे.
तालुकानिहाय टँकरची संख्या
संगमनेर 53
अकोले 6
कोपरगाव 10
राहुरी 1
नेवासा 26
राहाता 4
नगर 58
पारनेर 137
पाथर्डी 152
शेवगाव 59
कर्जत 91
जामखेड 89
श्रीगोंदा 46