लग्नात सॅनिटरी नॅपकिनची भेट; काळेवाडीत अनोखा विवाह सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2019 02:24 AM2019-06-01T02:24:28+5:302019-06-01T11:05:05+5:30

पाथर्डी तालुक्यातील मोहोजदेवढे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या काळेवाडी वस्तीवर बीड जिल्ह्यातील भारत गडदे आणि प्रतीक्षा पाताळे या दोघांचा शुक्रवारी विवाह झाला

Gift of sanitary napkins at wedding; Unique wedding ceremony in Kalewadi | लग्नात सॅनिटरी नॅपकिनची भेट; काळेवाडीत अनोखा विवाह सोहळा

लग्नात सॅनिटरी नॅपकिनची भेट; काळेवाडीत अनोखा विवाह सोहळा

Next

अहमदनगर: लग्नात रुखवत, वरमार्इंचे भोजन, सुनमूख पाहणे हे महिलांच्या आकर्षणाचे विषय असतात. पण, काळेवाडीत झालेल्या विवाह सोहळ्यात व-हाडी महिलांना वेगळीच भेट मिळाली. महिलांना सॅनिटरी नॅपकिन भेट देण्यात आले. लग्नात आशीर्वादाची भाषणेही नव्हती. त्याऐवजी मासिक पाळीत महिलांनी काय काळजी घ्यावी? ही भाषणे होती. 
पाथर्डी तालुक्यातील मोहोजदेवढे ग्रामपंचायत अंतर्गत येणा-या काळेवाडी वस्तीवर बीड जिल्ह्यातील भारत गडदे आणि प्रतीक्षा पाताळे या दोघांचा शुक्रवारी विवाह झाला. दोघांचेही आईवडील शेतकरी. या दुर्गम वस्तीवर बहुतांश धनगर कुटुंब राहतात. भारत हा युवा चेतना फाउंडेशन या संघटनेचा सदस्य आहे. या संघटनेतील युवकांनी आजवर अशाच आगळ्या प्रथा लग्नात रुढ केल्या आहेत. एका लग्नात पुस्तकांचा रुखवत होता. एका लग्नात साफसफाई मोहीम राबविण्यात आली. एका लग्नात वृक्षारोपणाचा संदेश देण्यात आला. 
भारतच्या लग्नात सॅनिटरी पॅडचे वाटप करुन महिलांचे मासिक पाळीत घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन करावयाचे ठरले. त्यानुसार अमर कळमकर, योगेश काकडे, प्रियदर्शनी पोळ, प्रकाश मानव, अशोक चिंधे, शुभम गोडसे, पूजा केरकळ, राणी कळमकर, ग्यानेश्वर आघाव, डॉ. पूजा आहिर, गणेश ठोंबरे या कार्यकर्त्यांनी लग्नाच्या अगोदर वधू-वरांच्या आईवडिलांची मानसिक तयारी केली. त्यानंतर दोन दिवस अगोदर गावात जाऊन गावक-यांना व महिलांना विश्वासात घेतले. तोवर ब-याच महिलांना सॅनिटरी पॅड म्हणजे काय? हे माहिती नव्हते. हे पॅड भेटवस्तूच्या स्वरुपात बंदिस्त करुन लग्नमंडपात वाटण्यात आले. पुण्यातील समाजबंध संस्थेचे कार्यकर्ते सचिन आशा सुभाष यांनी मार्गदर्शन करताना ‘यापुढे बाजारला गेल्यावर पत्नी, आई, बहिणीसाठी सॅनिटरी पॅड विकत आणत जा,’ असे आवाहन पुरुषांना केले. स्नेहालयचे डॉ. गिरीश कुलकर्णी, ‘लोकमत’चे आवृत्तीप्रमुख सुधीर लंके, अ‍ॅड. शाम असावा यांची सोहळ्यास  उपस्थिती होती. आशा सेविका सुरेखा काळे, सरपंच अजित देवढे, अंगणवाडी सेविका यांनीही उपक्रमासाठी पुढाकार घेतला. या उपक्रमामुळे महिलांचे मासिक पाळीबाबत प्रबोधन झाल्याचे सुरेखा काळे म्हणाल्या. लग्नात राबविलेला उपक्रम व गावाने दिलेली साथ कौतुकास्पद असल्याचं मत स्नेहालयाचे गिरीश कुलकर्णी यांनी व्यक्त केले. 

व्हेंडिंग मशिनचा आहेर
पैसे टाकल्यावर सॅनिटरी पॅड मिळेल असे व्हेंडिंग मशिनही लग्न समारंभात गावाला भेट देण्यात आले. यावेळी टेंड्रिल कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आरती शर्मा यांनीही महिलांना मासिक पाळी व सॅनिटरी पॅडबाबत मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे महिला, पुरुषांनी न लाजता हे सर्व मार्गदर्शन आनंदाने ऐकले.  
 

Web Title: Gift of sanitary napkins at wedding; Unique wedding ceremony in Kalewadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.