नगरमध्ये ६५० एस. टी. बस बंद; ५० लाखाचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 13:03 IST2017-10-17T12:54:13+5:302017-10-17T13:03:12+5:30
सोमवारी रात्री संप सुरु झाल्यापासून नगर विभागातून जाणा-या लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या. त्यानंतर मंगळवारी पहाटे ५.३० वाजल्यापासून सुरु होणारी ग्रामीण भागातील दैनंदिन वाहतूक पूर्णपणे बंद झाली. जिल्ह्यातील सर्व ११ आगारांमध्ये बस जागेवरच उभ्या आहेत. एकही वाहक, चालक मंगळवारी कामावर हजर झालेला नाही.

नगरमध्ये ६५० एस. टी. बस बंद; ५० लाखाचे नुकसान
अहमदनगर : विविध मागण्यांसाठी एस. टी. महामंडळाच्या वाहक, चालकांनी सोमवारी मध्यरात्रीपासून पुकारलेल्या संपामुळे एस. टी. महामंडळाच्या नगर विभागाचे तब्बल ५० लाखांचे नुकसान होणार असून, महामंडळाच्या ६५० बस जागेवरच उभ्या आहेत. दरम्यान या संपामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत.
राज्यात काही ठिकाणी संपास हिंसक वळण मिळाले असताना नगरमध्ये एस. टी. कर्मचा-यांचा संप शांततेत सुरु आहे. सोमवारी रात्री संप सुरु झाल्यापासून नगर विभागातून जाणा-या लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या. त्यानंतर मंगळवारी पहाटे ५.३० वाजल्यापासून सुरु होणारी ग्रामीण भागातील दैनंदिन वाहतूक पूर्णपणे बंद झाली. जिल्ह्यातील सर्व ११ आगारांमध्ये बस जागेवरच उभ्या आहेत. एकही वाहक, चालक मंगळवारी कामावर हजर झालेला नाही. केवळ एस. टी. प्रशासनाचे अधिकारी व काही कर्मचारी बसस्थानकात हजर झाले. तारकपूर आगारात चालक, वाहकांनी निदर्शने करीत आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्धार केला.
दरम्यान आरटीओ, जिल्हा प्रशासन व एस. टी. महामंडळ यांनी संयुक्तरित्या प्रवाशांच्या पर्यायी व्यवस्थेसंदर्भात हालचाली सुरु केल्या असून, तातडीचा प्रवास करणा-या प्रवाशांसाठी खासगी वाहतुकीची व्यवस्था करण्यात येत आहे़, अशी माहिती विभाग नियंत्रक नितीन मैंद यांनी दिली.
आरक्षण रद्द
ज्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले होते, त्या प्रवाशांचे आरक्षण रद्द करण्यात आले आहे. प्रवाशांना आरक्षणाची रक्कम परत करण्यात आली आहे. संपाच्या सर्व परिस्थितीवर एस. टी. महामंडळाचे अधिकारी लक्ष ठेवून आहेत. संप मागे घेण्याबाबत संघटनांशी चर्चा सुरु असल्याची माहिती एस. टी.च्या वरीष्ठ अधिका-यांनी दिली. दरम्यान दिवाळीसाठी पुणे, मुंबईहून गावाकडे येणा-या प्रवाशांची या संपामुळे मोठी गैरसोय झाली आहे.