आरामाची साधनं विकता घेता येतात; पण आनंदाचं काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2019 01:38 PM2019-07-03T13:38:01+5:302019-07-03T14:03:29+5:30

कितीही पैैसा खर्च केला तरी सुख सोयी, आरामाची साधनं विकत घेता येतात; पण आनंद नाही विकत घेता येत.

how to stay happy | आरामाची साधनं विकता घेता येतात; पण आनंदाचं काय?

आरामाची साधनं विकता घेता येतात; पण आनंदाचं काय?

Next

- रमेश सप्रे

निधी म्हणजे खजिना, ठेवा किंवा भांडार. सागराला जलनिधी म्हणतात. आपण मात्र निधी शब्द फक्त पैशाच्या संदर्भात वापरतो. निधीसंकलन म्हणजे पैसा जमवणं, कलेचा, गुणांचा, ज्ञानाचा, भक्तीचाही निधी असतो याची आपल्याला कल्पनाही नसते. आनंदाचा निधीही अशा प्रकारचा असतो. कितीही पैैसा खर्च केला तरी सुख सोयी, आरामाची साधनं विकत घेता येतात; पण आनंद नाही विकत घेता येत.

एक मार्मिक गोष्ट आहे. मृत्यूच्या क्षणी आपल्या दोन मुलांना बोलावून सांगितलं की शेतात जे राममंदिर आहे त्याच्या कळसात खूप धन लपवून ठेवलंय. मात्र रामनवमीचा उत्सव संपल्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता कळस फोडून मिळवलं तरच ते मिळेल. मुलं आळशी होती; पण ऐषारामाची त्यांना चटक लागली होती. ते तो दिवस येण्याची वाट पाहत होते. तसं ते मंदिर त्यांच्या पूर्वजांनी आपल्या शेतात बांधलं होतं. खूप कष्ट करून भरभराट झाल्यामुळे श्रीरामाबद्दल कृतज्ञता नि रामाच्या उपासनेकडे, मंदिराच्या देखरेखीकडे पूर्ण दुर्लक्ष केलं आणि होती ती धनदौलत उधळून टाकली; पण हा गुप्त निधी मिळाला तर पुन्हा चांगले दिवस येतील या आशेने रामनवमीच्या उत्सवाची गर्दी दुसरे दिवशी कमी झाल्यावर हे दोघे भाऊ हत्यारं घेऊन कळसावर चढले. वेळ सकाळची होती. दहा वाजायच्या सुमारास सर्व तयारीनिशी कळस फोडणार इतक्यात लोकांनी त्यांना पाहिलं; पण त्यांना पकडेपर्यंत दहा वाजले आणि कळस फोडला; पण आत काहीही सापडलं नाही. लोकांनी त्यांचा धिक्कार केला; पण शिक्षा केली नाही. कारण मंदिर त्यांच्याच मालकीचं होतं. हा प्रकार त्या शेतकऱ्यांच्या गुरूंना समजला. ते आले नि त्या दोघा भावांना उद्देशून म्हणाले, ‘मूर्खांनो असा कळसात कोणी रत्न, सोनं, नाणं,अलंकार याचा निधी लपवून ठेवू शकेल का? तुमच्या वडिलांच्या सांगण्याचा अर्थ होता त्या दिवशी त्यावेळी कळसाची सावली जिथं पडेल त्याच्या आजूबाजूला गुप्त निधी लपवून ठेवलाय. उद्याही तशीच सावली पडेल तुम्ही त्या ठिकाणाच्या आजूबाजूला खणून पाहा. निधी निश्चित मिळेल. मी काही दिवस इथंच थांबतो. ते दोघे भाऊ झपाटल्यासारखे खणत राहिले. अख्खं शेत त्यांनी खणून काढलं पण निधीचा पत्ता नाही. यावर गुरुदेव प्रसन्न होऊन म्हणाले, ‘आता पावसाळा जवळ आलाय. पेरणी करण्यासाठी चांगलं बी बियाणं आणा. आपण शेती करूया. त्या प्रमाणे केल्यावर काळाच्या ओघात शेतात भरघोस पीक डोलू लागलं. ते पाहून त्या भावांना, गुरुदेवांना तसेच गावकºयांनाही खूप आनंद झाला. कापणी करून धान्यानं कोठार भरल्यावर सर्व गावकºयांसमोर गुरुदेव म्हणाले, ‘पाहिलंत असा आयता गुप्त निधीबिधी काही नसतं. सामाजिक कष्टातून मिळवलेलं फळ हाच सारा आनंदाचा निधी असतो.’ किती खरंय हे! असेच तिघे भाऊ वडलांच्या अकस्मिक निधनानंतर सर्व संपत्ती उधळून दिवाळखोर बनले होते. एकेकाळी श्रीमंत असल्याने दुसºयाकडे नोकरी किंवा कष्टाचं काम करणं त्यांना कमीपणाचं वाटत होतं. वडील गल्ल्यावर बसून खूप गिºहाईक करायचे; पण वडिलांचा, कष्टाळूपणा, प्रामाणिकपणे केलेला व्यापार, लोकांशी केलेली सलगी हे गुण मुलांकडे नसल्याने ते वडील जिथं बसायचे त्याच जागी अगतिकपणे उपाशी बसून राहायचे.
एके दिवशी तीर्थयात्रेला गेलेला वडिलांचा जवळचा मित्र परतला. त्याला सारी हकीगत कळल्यावर तो मुलांकडे येऊन म्हणाला, ‘तुम्ही कर्मदरिद्री आहात, जिथं बसला आहात ना त्याच्याखाली तुमच्या वडिलांनी मोठ्या मेहनतीनं मिळवलेला निधी ठेवलाय. चला कुदळी, फावडी घेऊन या नि कामाला लागा. खोल खणल्यावर खरंच तीन तोंड बंद केलेले कुंभ होते ते उचलल्यावर पाहतात तर त्यात सुवर्णमुद्रा होत्या. ‘त्या सोन्याच्या नाण्यांनी पुन्हा कष्टानं व्यापार-व्यवसाय सुरू केला. केवळ आयता मिळालेला हा खजिना व्यर्थ संपवू नका.’ तिघाही भावांना वडिलांच्या मित्रानं दिलेला हा सल्ला पटला नि पुन्हा त्यांच्या जीवनात आनंदाचा निर्झर खळाळू लागला.

समर्थ रामदासांनी ‘यत्न तो देव जाणावा’ इतक्या स्पष्टपणे आनंदी जीवनासाठी प्रयत्न सायास कष्ट करण्यास सांगितलं आहे. प्रयत्न-प्रयोग-प्रचिती’ अशी त्रिसूत्री ते सांगत. दासबोध ग्रंथात अनेक ठिकाणी आनंदाचं असंच रहस्य त्यांनी वर्णन केलंय. ‘लक्ष्मीमध्ये करंटा नांदे। त्याचे दारिद्र्य अधिक सांदे।। म्हणजे साक्षात लक्ष्मीचा वास किंवा अस्तित्व आपल्या आत असूनही जो कमनशिबी करंटा असल्यासारखा वागतो त्याचं दारिद्र्य अधिक तीव्रतेनं जाणवतं.

दुसऱ्या ठिकाणी त्यांनी फार प्रत्ययकारक रितीनं म्हटलंय
‘भांडारे असती भरली। परी अडकून पडली। जोवरी हाता न ये किल्ली।।’ आनंदाची अक्षय भांडारं म्हणजे आनंदाचा निधी आपल्या आतच आहे; पण किल्ली हाती न लागल्याने अमूल्य निधी आत अडकून पडलाय. समर्थ म्हणतात ‘गुरुकृपा हीच ती किल्ली’ पण गुरूची कृपा म्हणजे गुरूचं मार्गदर्शन, उपदेश किंवा अनुग्रह. गुरू आपल्या आतील आनंदाच्या निधीचा पूर्ण उपभोग, आस्वाद घेण्यासाठी जी गुरूकिल्ली सुचवतात ती म्हणजे प्रयत्न-प्रयोग-प्रचिती. म्हणजेच खूप प्रयास, कष्ट नवनवीन मार्ग हेच आनंदाच्या अनुभवाचं (प्रचितीचं) रहस्य आहे. यात दुमत असायचं कारण नाही. खरं ना?

Web Title: how to stay happy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.