उपाधी मानिजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 06:39 AM2019-08-20T06:39:59+5:302019-08-20T06:40:08+5:30
अहं म्हणणारा जेव्हा ‘दासोहं’ म्हणतो तेव्हा त्याला आनंदाचा गर्व असतो. असं लहानपण संत तुकोबाही देवाला मागतात.
- बा.भो. शास्त्री
उपाधी हा शब्द, धा, धातूला उप व आ हे दोन उपसर्ग लागून तयार झालेला शब्द आहे. उप म्हणजे जवळ. आ म्हणजे पर्यंत. धातूला की प्रत्यय लागला, धा चा धी झाला. धी म्हणजे बुद्धी किंवा प्रतिष्ठा म्हणजे बुद्धीचा किंवा प्रतिष्ठेजवळ पोहोचलेला. उपाधीमंत म्हणजे बुद्धिमंत किंवा प्रतिष्ठित हाच सूत्राचा आशय आहे. ज्यात सकारात्मक गुणांचा स्वीकार व नकारात्मक ऊर्जेचा अभाव असतो. त्याला जाणते उपाधी देऊन सन्मानित करतात. उपाधीधारक त्या पदाला प्राप्त झाला असं समजावं. ओघानेच ती व्यक्ती आदर व सन्मानाला तर पात्र होतेच. पण आपणही हिमालय पर्वताच्या पायथ्याजवळ बसल्याचा आनंद अनुभवत असतो. दिव्यात्वापुढे नतमस्तक होणं हीच खरी आपली संस्कृती आहे. जे जे भव्य, दिव्य आहे, त्यापुढे नम्र होण्यात मजा आहे. अहं म्हणणारा जेव्हा ‘दासोहं’ म्हणतो तेव्हा त्याला आनंदाचा गर्व असतो. असं लहानपण संत तुकोबाही देवाला मागतात.
‘‘हेचि दान देगा देवा
तुझा विसर न व्हावा
गुण गाईन आवडी
हेचि माझी सर्व जोडी’’
अपूर्व मागणं मागितलं आहे. आशीर्वाद देणारा तर मोठा असतोच पण तुकोबाने मागणाराही मोठा केला आहे. उपाधीवंत कसा असतो याचं उदाहरण देताना समर्थ शिवरायांकडे बोट दाखवतात.
‘‘निश्चयाचा महामेरू
बहुत जनांसी आधारू
अखंड स्थितीचा निर्धारू
श्रीमंतयोगी’’
अशा पुरुषाचं कर्तृत्व, नेतृत्व, जाणतेपण मानायलाच हवं. त्याच्या सद्गुणांचं कौतुक करावं, सुज्ञ समाजाने त्याची गुणवत्ता पारखून त्याला उपाधी बहाल केली आहे.