स्मशानभूमीच मिळेना
By Admin | Updated: August 4, 2014 00:47 IST2014-08-03T23:56:41+5:302014-08-04T00:47:39+5:30
बळीराम कच्छवे, दैठणा परभणी तालुक्यातील दैठणा गावामध्ये अनेक वर्षांपासून स्मशानभूमीचा प्रश्न रखडला आहे़ आजही येथील ग्रामस्थांना उघड्यावरच अंत्यविधी उरकावा लागत आहे़

स्मशानभूमीच मिळेना
बळीराम कच्छवे, दैठणा
परभणी तालुक्यातील दैठणा गावामध्ये अनेक वर्षांपासून स्मशानभूमीचा प्रश्न रखडला आहे़ आजही येथील ग्रामस्थांना उघड्यावरच अंत्यविधी उरकावा लागत आहे़ त्यामुळे ग्रामस्थ व नातेवाईकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे़
दैठणा या गावाची लोकसंख्या अंदाजे १० ते १५ हजार एवढी आहे़ या गावामध्ये सर्वाधिक राजपूत समाजाची लोकसंख्या आहे़ तसेच सर्वजाती-धर्माचे लोक येथे राहतात़ एवढ्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या गावासाठी स्मशानभूमीच नाही़ त्यामुळे गावालगत असलेल्या इंद्रायणी नदीच्या काठावर मोकळ्या जागेत अंत्यविधी उरकून घ्यावा लागतो़ या ठिकाणी ग्रामस्थ व नातेवाईकांना उभे राहण्यासाठी जागा नाही़ त्यामुळे अडचणींचा सामना करावा लागतो़ गावासाठी स्मशानभूमीसाठी जागा द्यावी यासाठी संबंधित विभागाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला़ परंतु, शासन दरबारी हा प्रस्ताव वर्षानुवर्षे रखडत पडला आहे़ शासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे स्मशानभूमीचा प्रश्न बासनात बसला आहे़ तसेच स्मशानभूमी नसल्यामुळे शेडही नाही़ शासन दरवर्षी यावर कोट्यवधी खर्च करीत आहे़ मात्र हा निधी कुठे जातो हा प्रश्नच आहे़
निधी जातो कुठे
जिल्ह्यासाठी दरवर्षी स्मशानभूमी व शेड बांधण्यासाठी कोट्यवधींचा निधी येतो़ हा निधी कागदोपत्रीच खर्च केला जात असल्यामुळे या ठिकाणी ना शेड झाला ना स्मशानभूमी. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे़
दोन दिवस मृतदेह होता घरातच
गतवर्षी दैठणा येथे पावसाळ्यात एकाचा मृत्यू झाला होता़ सतत दोन दिवस पाऊस पडत असल्यामुळे मृतदेह घरातच ठेवावा लागला होता़ त्यामुळे घरचे व नातेवाईकांना मानसिक त्रास सहन करावा लागला़ याचे सोयरसूतक कोणालाच नाही़