यवतमाळ : जिल्हा परिषदेतील कर्मचारी कल्याण निधीच्या ठेवी संदर्भात संभ्रम निर्माण झाला होता. चर्चेच्या गुऱ्हाळानंतर कर्मचारी संघटना आणि कल्याण समितीने हा निधी पतसंस्थेतून टप्याटप्याने राष्ट्रीयकृत बँकेत वळता करण्याचा निर्णय घेतला. तसेच कल्याण समितीला धर्मदाय आयुक्तांची मान्यात घेण्याच्या प्रक्रियेलाही सुरूवात करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेत वर्ग तीन आणि वर्ग चारच्या संवर्गातील तब्बल पाच हजार कर्मचारी आहेत. वेतनातून महिन्याकाठी ठराविक रक्कम कपात केली जाते. ही रक्कम कर्मचारी कल्याण निधीमध्ये जमा होते. हा निधी ठेव स्वरूपात आहे. यावर समितीला मोठे व्याज मिळते. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. सेवेत असताना कोणते संकट ओढवल्यास कर्मचाऱ्यांना थेट मदत केली जाते. त्यामुळेच कल्याण निधीची सुरूवात करण्यात आली होती. त्यावेळी वेतन कमी असल्याने रक्कमसुध्दा थोडीच जमा होत होती. याच कारणाने धर्मदाय आयुक्तांची परवानगी घेण्यात आली नाही. आता मात्र परिस्थिती बदली असून हा निधी कसा सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. निधी टप्प्या टप्प्याने काढून राष्ट्रीयकृत बँकेत जमा केला जाणार आहे. ठेवी स्वरूपात असलेल्या निधी मुदत संपताच वळता होणार आहे. १ आॅक्टोबरपासून कल्याण निधीसाठी कपात केलेली रक्कम थेट राष्ट्रीयकृत बँकेत जमा करणार असल्याचे जिल्हा परिषद कर्मचारी युनियचे अध्यक्ष संजय गावंडे, सरचिटणीस दिलीप कुडमेथे यांनी सांगितले. कल्याण समितीच्या बैठकीत झालेल्या ठरावानुसारच हा निधी या पुढेही असाच सुरू ठेवण्यात येईल असेही सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)
जिल्हा परिषद कल्याण निधी राष्ट्रीयकृत बँकेत
By admin | Updated: September 26, 2015 02:29 IST