हस्तांतरण रखडले : आठ शाळा, ७५ शिक्षकयवतमाळ : येथील नगरपरिषद हद्दीत जिल्हा परिषदेच्या आठ शाळा सुरू आहेत. यवतमाळ नगरपरिषदेची हद्दवाढ झाल्याने लगतच्या सात ग्रामपंचायतींचे हस्तांतरण करण्यात आले. मात्र तेथील शाळांचे हस्तांतरण रखडले आहे.यवतमाळ नगरपरिषदेची हद्दवाढ झाली आहे. यात शहरालगतच्या सात ग्रामपंचायतींचा समावेश यवतमाळ नगरपरिषदेत करण्यात आला. आता लवकरच नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूकही होत आहे. हद्दवाढीमुळे लोहारा, वाघापूर, पिंपळगाव, वडगाव, उमरसरा आदी ग्रामपंचायती नगरपरिषदेत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. तेथील ग्रामपंचायत कार्यालय आता नगरपरिषदेचे केंद्र म्हणून काम पाहात आहे. ग्रामपंचायतींचे कर्मचारीही आता नगरपरिषदेत समाविष्ट झाले आहे. मात्र या ग्रामपंचायत क्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या शाळा अद्यापही नगरपरिषदेला हस्तांतरीत झाल्या नाहीत. लोहारा येथील जिल्हा परिषदेत शाळेत सर्वाधिक तब्बल २२ शिक्षक असून ६00 च्यावर विद्यार्थी तेथे शिक्षण घेत आहेत. याशिवाय वाघापूर, वडगाव, उमरसरा, पिंपळगाव, मोहा, डोर्ली येथील शाळेवर जवळपास ५५ च्यावर शिक्षक कार्यरत आहेत. या सर्व शाळांमध्ये ४00 च्यावर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या सर्व शाळा, विद्यार्थी, शिक्षक सध्या जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येत आहे. त्या सर्वांना नगरपरिषदेत समाविष्ट होण्याची प्रतीक्षा आहे.(शहर प्रतिनिधी)
नगरपरिषद हद्दीत जिल्हा परिषद शाळा
By admin | Updated: September 25, 2016 02:52 IST