आक्रमकता नष्ट : अभ्यासाची वानवा, हितसंबंधांची बाधा लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जिल्हा परिषदेत प्रबळ विरोधकाची भूमिका निभावण्याऐवजी बोटचेपी भूमिका घेतल्याने शिवसेनेची धार बोथट झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे सत्ताधारी सुखावले असून विरोधक अभ्यासाच्या कमतरतेने कमकुवत ठरल्याचे दिसत आहे. निवडणुकीनंतर सर्वात मोठा पक्ष म्हणून शिवसेना उदयास आली. या पक्षाचे सर्वाधिक २० सदस्य विजयी झाले. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीच्या सहकार्याने त्यांचीच सत्ता येणार, अशी सर्वत्र चर्चा असतानाच भाजपाने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला हाताशी धरून त्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला. त्यावेळपासून शिवसेना सदस्य जे थंडावले, ते आजतागायत तेच चित्र कायम आहे. वास्तविक सत्तेची संधी हुकल्याने शिवसेना सदस्य जादा आक्रमक होतील, अशी जनतेला अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात झाले उलटेच. विषय समिती गठनानंतर तर शिवसेना सदस्य प्रचंड शांत झाले. स्थायी, बांधकाम व इतर समितीत तडजोडीने स्थान पटकावून त्यांनी सत्ताधाऱ्यांसमोर नांगी टाकली. त्यानंतर झालेल्या प्रत्येक विषय समितीच्या मासिक सभेत शिवसेनेचे सदस्य कधीच आक्रमक झाल्याचे ऐकिवात नाही. स्थायी समितीतसुद्धा या पक्षाचे सदस्य विरोधक असल्याचे विसरले. केवळ आपल्या हितसंबंधाचे प्रश्न उपस्थित करून ते धन्यता मानत आहे. आपल्या व्यवसायाशी निगडीत प्रश्न मांडण्यावरच त्यांचा भर दिसतो. यातून शिवसेना नरमल्याचे स्पष्ट होत आहे. सत्ताधारी काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादीचेच काही पदाधिकारी व सदस्य सर्वसाधारण सभा आणि विषय समिती बैठकीत आक्रमक होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विरोधकांचा आवाज क्षीण झाल्याने सत्ताधारीही निश्चिंत झाले आहेत. अभ्यासाच्या अभावाने विरोधक निष्प्रभ नवीन सदस्यांमध्ये अभ्यासाचा अभाव दिसून येतो. वयाने मोठे असलेले काही सदस्य विषयांची पुरेपूर माहिती घेऊन येतच नाही. परिणामी भर सभेत त्यांच्यावर ‘नंतर बोलतो’, असे म्हणण्याची वेळ ओढवते. सर्वसाधारण सभेत त्याची प्रचिती आली. अभ्यास नसल्याने विरोधक निष्प्रभ ठरत आहे. ज्यांना थोडा अभ्यास असल्याचे जाणवते, ते केवळ आपल्या व्यवसायाशी निगडीतच विषयांवर भर देताना दिसतात. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमधील दरीच नष्ट झाली आहे.
जिल्हा परिषदेत विरोधकांची धार बोथट
By admin | Updated: July 1, 2017 00:55 IST