अहीर यांचे प्रतिपादन : प्रकल्पग्रस्तांना वाटले वाढीव मोबदल्याचे २५ कोटीवणी : वणी क्षेत्र दगडी कोळशाचे आगार आहे. या दगडी कोळशापासून वीज निर्माण करण्यासोबतच त्यापासून युरिया बनविण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. आता काळ्या कोळशापासून पांढरा युरिया बनविणारा प्रकल्प येत्या काही वर्षात वणी विभागात आणू, ते आपले स्वप्न असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सांगितले.नव्याने सुरू होणाऱ्या जुनाड कोळसा खाणीसाठी ९३ शेतकऱ्यांची ३२० एकर जमीन वेकोलिने संपादित केली. त्या प्रकल्पग्रस्तांना आठ ते नऊ लाख रूपये प्रति एकर दराने मोबदला वेकोलिकडून देण्यात आला. त्याच्या धनादेशाचे वितरण रविवारी वेल्हाळा मंदिराच्या प्रांगणात एका कार्यक्रमात करण्यात आले. शेतकऱ्यांना ४६ लाखांपासून तर दोन लाखापर्यंतचे धनादेश यावेळी वितरीत करण्यात आले. तत्पूर्वी अहीर यांनी गोमातेचे पूजन केले. त्यानंतर मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पुढे बोलताना केंद्रीय रसायन व खत राज्यमंत्री अहीर यांनी वेकोलिकडून मंजूर झालेल्या नव्या योजनांची माहिती दिली. स्थानिक बेरोजगारांना काम देणे, अधिग्रहीत जमीन पडीत न ठेवता ती शेतमजुरांना वहितीसाठी देणे, अंध-अपंगांना नोकरीत आरक्षण देणे, या योजनांचा यात समावेश आहे. शेतकऱ्यांनी मिळणाऱ्या पैशाचा सदुपयोग करावा, अशी विनंती अहीर यांनी केली. त्यासाठी बँकांच्या अधिकाऱ्यांना बोलावून त्यांच्याकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. चंद्रपूर येथे कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार असून दरवर्षी ५०० युवकांना प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे सांगितले. लवकरच तुकडेबंदी कायदा अंमलात येणार असून आता प्रकल्पग्रस्तांना दोन एकरावर एक नोकरी मिळणार असल्याचे जाहीर केले. शेतकऱ्यांच्या भव्य पाठींब्यामुळेच आपण हा लढा जिंकू शकल्याचे कबूल करीत अहीर यांनी शेतकऱ्यांचे आभार मानले.यावेळी प्रथम राहुल सराफ यांनी वेकोलि प्रकल्पग्रस्तांच्या व्यथा मांडल्या. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी वेकोलित प्रकल्पग्रस्तांना शैक्षणिक पात्रतेनुसार नोकऱ्या मिळाव्या. वेकोलिकडे कार्यरत खासगी कंपन्यामध्ये बेरोजगारांना रोजगार द्यावा. परिसरातील शाळा डीजिटल करण्यासाठी शाळांना दोन लाख रूपये द्यावे. नीलगिरी वनात फॉरेस्ट पार्कची निर्मिती करावी व रेल्वे सायडींग शहरापासून दूर न्यावी, अशा मागण्या वेकोलि प्रशासनाकडे केल्या.वेकोलिचे महाप्रबंधक राजीव रंजन मिश्र यांनी वेकोलिची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याचे सांगून कंपनी सतत तीन वर्षांपासून तोट्यात आहे. त्यामुळे पुढील ३६ महिन्यांत नव्या ३६ खाणी सुरू करून कंपनीला सुधारण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले. मात्र शेतकऱ्यांना नाराज करून वेकोलि खाण सुरू करणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. मंचावर वेकोलिचे तांत्रिक निदेशक एस.एस.मल्ही, कार्मिक निदेशक डॉ.संजयकुमार, मुख्य महाप्रबंधक (संचालन) आर.सी. सतोडिया, उमाशंकर सिंग, रमेश बल्लेवार, विजय पिदुरकर, राजेंद्र डांगे, सरपंच किरण कोडापे, उपविभागीय अधिकारी शिवानंद मिश्रा उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
वणीत कोळशापासून युरिया
By admin | Updated: November 10, 2015 03:08 IST