आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी साजऱ्या होणाऱ्या ‘फ्रेंडशिप डे’ सेलेब्रेट करण्यासाठी तरुणाई सज्ज झाली असून मैत्रीच्या बंधनात अडकविण्यासाठी रंगीबेरंगी बँड अंगठ्या आणि ताईत खरेदीची धूम सुरू आहे. लहानांपासून तर तरुणांपर्यंत सर्वच जण मैत्रीच्या बंधनात अडकण्यासाठी आतूर असल्याचे दिसून येते. पाश्चिमात्य संस्कृतीचा तरुणाईवर मोठा पगडा असून यातूनच ‘डे’ संस्कृती वाढत आहे. विविध ‘डे’ साजरे करणाऱ्या तरुणाईसाठी फ्रेंडशिप डे म्हणजे पर्वणी असते. आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी जगभर हा डे साजरा केला जातो. यवतमाळातही अलीकडच्या काही वर्षात त्याची धूम दिसत आहे. या डे ला कॅश करण्यासाठी बाजारपेठ सज्ज झाली आहे. शहरातील मुख्य बाजारासह गल्लोगल्लीतील दुकानात फ्रेंडशिप बँड लटकलेले दिसून येत आहे. तरुण-तरुणी एवढेच नाही तर शालेय विद्यार्थीही बँड खरेदी करताना दिसत आहे. हातावर बांधण्याच्या बँडचे विविध प्रकार बाजारात दिसत आहे. प्लास्टिकवर रेडियमचा वापर करून बेल्ट तयार करण्यात आले आहे. रात्रीच्यावेळी हे बेल्ट चमकतात. पाच रुपयांपासून दहा रुपयांपर्यंत त्याची किंमत आहे. प्लास्टिकसोबत इतरही बँड बाजारात दिसत आहे. एक दिवसाच्या या उत्सवासाठी तरुणाई मोठ्या प्रमाणात खर्च करताना दिसत आहे. बँड खरेदी करताना सिनेमातील अभिनेत्यांच्या हातावर दिसणारे बँडही विक्रीस आले आहे. गोल्डन, प्लॅटिनम बँडही बाजारात आहे. फ्रेंडशिप बँडसोबत अंगठीही बाजारात दिसत असून काही दुकानात फ्रेंडशिपचे ताईतही विक्रीस आले आहे. कलाकुसरीच्या वस्तूचा वापर करून त्याची विक्री केली जात आहे. एकमेकांच्या हाताला बँड बांधून मैत्रीचे बंधन घट्ट करण्यासाठी तरुणाई सज्ज आहे.
मैत्रीच्या बंधनात अडकण्यासाठी तरुणाई सज्ज
By admin | Updated: August 2, 2015 02:27 IST