वणी : शासनाने जनहिताचे कायदे केले. तथापि या कायद्यांचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळेच सार्वजनिकस्थळी धूम्रपान बंदी कायद्याची सर्रास पायमल्ली होत आहे. या धुम्रपानाच्या विळख्यात आजचा युवक पूर्णत: गुरफुटून गेला आहे.सर्वत्र सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात धुम्रपान होताना दिसत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. शासनाने पाच वर्षांपूर्वी गांधी जयंतीपासून सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान बंदीचा कायदा केला. त्या कायद्यानुसार सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. मात्र या कायद्याला सर्वच सार्वजनिक स्थळी चक्क हरताळ फासला जात आहे. शहरासोबतच ग्रामीण भागातही सार्वजनिकस्थळी विडी, सिगरेटचा धूर सोडला जात आहे. बसस्थानक, कॅन्टीन, पानटपरी, शासकीय कार्यालये धूम्रपानाच्या विळख्यात सापडली आहेत. शासकीय कार्यालयांच्या भिंतीवर धूम्रपान बंदीचे फलक लागलेले असतात. मात्र या कार्यालयांना लागूनच असलेल्या पानटपऱ्यांवर खुलेआम विडी, सिगरेटची विक्री जोमाने सुरू आहे. सामान्य नागरिकांसोबतच जबाबदार कर्मचारी व अधिकारी कार्यालयीन कामातून वेळांत वेळ काढून कार्यालयाच्या आडोशाला जाऊन सिगरेटचा धूर काढताना दिसत आहेत.अनेक कार्यालयांतील शौचालय व मुतारीत पडलेले सिगरेटचे तुकडे लक्षात घेता, शासकीय कर्मचाऱ्यांकडूनच या कायद्याचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. अनेक शिक्षकही दुपारच्या सुटीत शालेय परिसरातील पानठेल्यावर खुलेआम सिगरेटचा धूर सोडतानाचे दृश्य ग्रामीण भागात दिसून येते. (कार्यालय प्रतिनिधी)
धुम्रपानाच्या विळख्यात युवक
By admin | Updated: October 16, 2014 23:32 IST