पुसद : तालुक्यातील बेलगव्हाण जंगलात दोन दिवसांपूर्वी आढळलेल्या अनोळखी तरुणाच्या प्रेताची ओळख पटली असून, त्याचा अनैतिक संबंधाच्या संशयातून दगडाने ठेचून खून केल्याचे पुढे आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महादेव शेषराव फोफसे (२५) रा. वसंतपूर खेर्डा ता. दिग्रस असे मृताचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी त्याचे प्रेत बेलगव्हाण जंगलात आढळले होते. ही बाब बेलगव्हाणचे उपसरपंच विशाल काटे यांनी पुसद ग्रामीण पोलिसांना दिली. ग्रामीणचे ठाणेदार धनंजय जगदाळे यांनी घटनेचे गांभिर्य ओळखून घटनास्थळ गाठले. शवविच्छेदन करण्यात आले. शरीरावरील खुना व शवविच्छेदन अहवालावरून हत्या झाल्याचे लक्षात आले. तसेच त्याची ओळखही पटविण्यात आली. महादेव फोफसे असे त्याचे नाव असून, तो वसंतपूर येथे शेतमजुरीचे काम करीत होता. त्याचे गावातील एका मुलीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. यावरूनच त्याला बेलगव्हाणच्या जंगलात आणून दगडाने ठेचून हत्या केली असावी असा कयास आहे. दरम्यान महादेव ४ सप्टेंबर रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार त्याचे वडील शेषराव फोफसे यांनी दिग्रस पोलिसात दिली होती. दरम्यान ६ सप्टेंबर रोजी त्याचे छिनविच्छन प्रेतच आढळून आले. याप्रकरणी पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात गजानन भिवाजी गिरटकर (३०) व शंकर संजय पांडे (२३) रा. वसंतपूर खर्डा यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वृत्त लिहिस्तोवर आरोपींना अटक करण्यात आली नव्हती. आरोपींच्या अटकेसाठी पोलीस पथक रवाना करण्यात आल्याचे ठाणेदार धनंजय जगदाळे यांनी सांगितले. आरोपींच्या अटकेनंतर या खुनाचे रहस्य उलगडणार असल्याचेही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)
‘त्या’ तरुणाची हत्या अनैतिक संबंधाच्या संशयातून
By admin | Updated: September 9, 2016 02:50 IST