लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जातीपातीच्या आणि द्वेषाच्या भिंती ओलांडणारा तो तरुण. आपल्या ध्येयासाठी सर्वस्व पणाला लावणारा तो तरुण. स्त्री-पुरुष समतेवर विश्वास असणारा तो तरुण. रास्त मागण्यांसाठी आंदोलनात उतरतो तो तरुण. अडचणींवर मात करून आदर्श जगाचे स्वप्न संविधानाच्या मार्गाने मिळविते तोच तरुण. आधुनिक विचाराचा तो तरुण, अशी तरुणाची ओळख असायला हवी, असे प्रतिपादन श्रृती गणेश राही यांनी केले.येथे आयोजित डॉ. वि.भि. कोलते स्मृती व्याख्यानमालेचे दुसरे विचारपुष्प त्यांनी गुंफले. ‘तरुण आणि राजकारण’ या विषयावर त्या बोलत होत्या. आजची तरुण पिढी अनेक विरोधाभासी जीवन जगत आहे. आजही आम्ही आमच्या विकासापेक्षा इतरांच्या दोषांकडे लक्ष ठेवतो. प्रतिष्ठेचा अहंकार बाळगून आजही मुला-मुलींना मारले जाते. मोबाईलवर एकाचवेळी अनेक विसंगत व्हिडिओ पाहून आम्ही पार गोंधळून गेलो आहोत. स्त्री-पुरुष समतेवर आजही आमचा विश्वास नाही. विज्ञानाने जग जवळ आणले तरी मनाने आम्ही खूप दूर झालो आहोत. निरर्थक गोष्टींसाठी वाद, चर्चा आणि दंगलीचे आम्ही शिकार झालो आहोत. प्राथमिक गरजांपेक्षा दुय्यम गोष्टींना आम्ही महत्त्व देतो आहोत. आज राज्यसंस्थेला हवी असलेली भीती जनमाणसात व्यवस्थित रूजलेली आहे. एवढेच नव्हे तर आपल्या सर्वच गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यसंस्था कार्यरत आहे, असे श्रृती राही म्हणाल्या.व्याख्यानापूर्वी आचार्य पदवी विभूषित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यात डॉ. सुनील पातालबन्सी, डॉ. मंजूश्री जगताप, डॉ. सागर नंदूरकर, डॉ. संजय राचलवार, डॉ. नीकिता बागडी यांचा समावेश आहे. संचालन प्रा. कल्पना राऊत यांनी केले. आभार प्रशांत कराळे यांनी मानले.
युवा पिढी विरोधाभासी जीवन जगत आहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 06:00 IST
आजची तरुण पिढी अनेक विरोधाभासी जीवन जगत आहे. आजही आम्ही आमच्या विकासापेक्षा इतरांच्या दोषांकडे लक्ष ठेवतो. प्रतिष्ठेचा अहंकार बाळगून आजही मुला-मुलींना मारले जाते. मोबाईलवर एकाचवेळी अनेक विसंगत व्हिडिओ पाहून आम्ही पार गोंधळून गेलो आहोत. स्त्री-पुरुष समतेवर आजही आमचा विश्वास नाही. विज्ञानाने जग जवळ आणले तरी मनाने आम्ही खूप दूर झालो आहोत.
युवा पिढी विरोधाभासी जीवन जगत आहे
ठळक मुद्देश्रृती राही : वि.भि. कोलते व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प, ‘तरुण आणि राजकारण’वर भाष्य