पांढरकवडा : तालुक्यातील पाटणबोरी येथील योगिता सिडाम या युवतीची हत्या होऊन आता १९ दिवस लोटले आहे. मात्र तिचे मारेकरी अद्यापही मोकाटच फिरत आहे़ तिच्या मारेकऱ्यांचा शोध लावण्यास पोलीस तूर्तास असमर्थ ठरले आहे़गेल्या ३० मार्च रोजी खुनी नदीच्या पात्रात सकाळी योगिता नागोराव सिडाम या युवतीचा संशयास्पद स्थितीतील मृतदेह आढळून आला़ होता. योगिता सिडामची हत्या करून तिचा मृतदेह खुनी नदीच्या पात्रात टाकण्यात आला होता. विशेष म्हणजे मृतदेह अर्धवट जळालेल्या स्थितीत होता़ त्यामुळे या खुनाचे रहस्य अधिकच गडद झाले आहे. शवविच्छेदन अहवालात तिच्या डोक्याला जबर मार लागल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. संपूर्ण चौकशीअंती हा नियोजनबध्द रितीने करण्यात आलेला खूनच असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे.पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपीविरूद्ध भादंवि ३०२, २०१ कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर योगिताच्या मारेकऱ्याला तातडीने अटक करण्यात यावी, या मागणीसाठी आदिवासी संघटनेतर्फे मोर्चाही काढण्यात आला होता. अत्यंत गुंतागुंतीच्या या प्रकरणाची पोलिसांनी सर्व बाजूंनी कसून चौकशी केली़ अद्यापही वेगवेगळ्या पैलूंवर चौकशी सुरूच आहे. या खुनाचा छडा लावण्यासाठी यवतमाळ येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजय पुजलवार यांच्यासह त्यांचे पथक पांढरकवडा येथे ठाण मांडून होते. ते अद्याप या प्रकरणाचा तपास करीतच आहे़ एव्हढेच नव्हे, तर खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे पाटणबोरी येथे येऊन गेले़ तेथील पोलीस चौकीवरही ते बराचवेळ थांबले. त्यानंतर मृतक योगिताच्याही घरी गेले़ तिच्या कुटुंबाची भेट घेतली़ तिच्या घराच्या परिसराची तसेच घटना स्थळाची पाहणीही केली़ पोलीस अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या़ आरोपीला त्वरित अटक करण्याची त्यांनी ग्वाहीही दिली़ तथापि योगिताचा खून होऊन १९ दिवस लोटल्यानंतरही अद्याप पोलिसांना मारेकऱ्याचा शोध लागला नाहे. गुन्हे शाखेचे प्रयत्नही निष्फळ ठरले आहे. (तालुका प्रतिनिधी)
योगिताचे मारेकरी अद्याप मोकाटच
By admin | Updated: April 18, 2015 02:15 IST