विजय दर्डा : स्मृतिदिनानिमित्त ‘मुजरा स्वरराजाला’ यवतमाळ : गुरुवर्य पं.पुरुषोत्तम कासलीकर यांचे आणि आमचे अनेक वर्षांपासून पारिवारिक संबंध आहेत. आमचे आजोबा आणि कासलीकर एकाच गावचे. स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी संगीताचे दर्दी होते. पुढे काही महिने मीसुद्धा संगीताचे धडे गिरविले. परंतु पत्नी ज्योत्स्नाने शास्त्रीय संगीत पं.पुरुषोत्तम कासलीकर अर्थात ‘आबा’कडून हस्तगत केले. त्यांच्यामुळेच जगप्रसिद्ध संगीतकार आणि गायकांना बोलावण्याची ऊर्जा आम्हाला प्राप्त झाली. ही प्रेरणा देणारे पं. कासलीकर यवतमाळचे स्वरराज होते, यवतमाळची शान होते, अशा भावपूर्ण शब्दात लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी श्रद्धांजली अर्पण केली. येथील दर्डा मातोश्री सभागृहात मंगळवारी गुरुवर्य पं.पुरुषोत्तम कासलीकर यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त पुणे येथील प्रख्यात गायिका मधुवंतीताई दांडेकर यांचा ‘मुजरा स्वरराजाला’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून खासदार दर्डा बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र विधानसभेचे माजी उपाध्यक्ष प्रा.वसंतराव पुरके, निवृत्त अतिरिक्त पोलीस महासंचालक तथा राज्य पोलीस तक्रार समितीचे सदस्य पी.के. जैन, पुणे येथील भारत गायन समाजचे उपाध्यक्ष सुहास दातार, ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ अरुण हळबे, ज्येष्ठ तबला वादक गुणवंतराव ठाकरे आणि गायिका मधुवंतीताई उपस्थित होत्या. सुरवातीला प्राचार्य डॉ.विनायक भिसे यांच्या मार्गदर्शनात गुरुस्तवन व नांदी सादर करण्यात आली. प्रास्ताविकातून राजश्री भानावत (कासलीकर) यांनी पंडितजीच्या नावाने एखादी चिरंतन कला अकादमी स्थापन्याची इच्छा व्यक्त केली. अशा अकादमीला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन खासदार विजय दर्डा आणि इतर मान्यवरांनी दिले. खासदार दर्डा हस्ते पंडितजींच्या निवडक गाण्यांची सीडी ‘तू माझी माऊली’चे लोकार्पण करण्यात आले. या सीडीची रक्कम निळोणा येथील वृद्धाश्रमास दान दिली जाईल, अशी घोषणा करण्यात आली.प्रसंगी पी.के. जैन, प्रा.वसंतराव पुरके, सुहास दातार, अरुण हळबे, गुणवंतराव ठाकरे आणि उज्ज्वला भालेराव यांनीही मनोगत व्यक्त केले. संचालन अश्विनी इंदूरकर यांनी केले तर साधना कासलीकर यांनी आभार मानले. भगवतगीता, पूर्ण अमृतसरिता या भैरवीने या संगीत कार्यक्रमाची सांगता झाली. संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज आणि रसिकजनांची उपस्थिती यावेळी होती. (सांस्कृतिक प्रतिनिधी)नाट्यपदांनी जागविल्या छोटा गंधर्वंच्या आठवणीसुरांची आदरांजली अर्पण करण्याकरिता मधुवंतीताई दांडेकर यांचा कार्यक्रम सुरू झाला. त्यांच्योसोबत सहगायक म्हणून सुचेता अवचट आणि रवींद्र कुळकर्णी होते. संवादिनीवर संजय गोगटे, व्हायोलिनवादक अविनाश लघाटे, तर तबल्यावर माधव मोडक होते. स्वरराज छोटा गंधर्व हे कासलीकरांचे व मधुवंतीतार्इंचे संगीतगुरू त्यांना ‘दादा’ म्हणत. दादांसोबत अनेक नाटकात नायिका आणि गायिका अशा दुहेरी भूमिका मधुवंतीतार्इंनी केल्या आहेत. सर्वप्रथम छोटा गंधर्व यांची बंदिशी सादर करून ‘एकदन्त लंबोदर’ त्यांनी छोटा ख्याल एकतालात सादर केला. ‘तुज वाचून कोणा शरण’ हा तुकारामांचा अभंग सुचेतांनी गायिला. रवींद्र कुळकर्णींनी नाट्यगीत ‘या नव नवलोत्सवा’ सादर केले. ‘सुवर्णतुला’ या संगीत नाटकातील ‘अंगणी पारीजात फुलला’ हे नाट्यगीत रसिकांना खूप आवडले. संपूर्ण कार्यक्रमात त्यांनी पं.पुरुषोत्तम कासलीकर यांचे गुरुवर्य स्वरराज छोटा गंधर्व यांची नाट्यपदे-बंदिशी ऐकवून श्रोत्यांना दादांची आठवण करून दिली.
पुरुषोत्तम कासलीकर संगीत क्षेत्रात यवतमाळचे ‘स्वरराज’
By admin | Updated: August 27, 2015 00:09 IST