उलाढाल दुणावली : लॉज-हॉटेलचे दर वाढले, आॅटोची सवारी जोरात यवतमाळ : मोर्चा, आंदोलन आणि उत्सवात शहरातील रस्ते ओसंडून वाहतात. मात्र सध्या यातले कुठेच काही नाही. तरी तरुणांचे जत्थेच्या जत्थे शहरात येत आहेत. यामुळे यवतमाळ जणू ‘महानगर’ असल्याचा अनुभव येत आहे. जिल्हा परिषद पदभरतीच्या परीक्षेकरिता विविध जिल्ह्यांतून युवक यवतमाळात दाखल झाल्याने शहराच्या उत्पन्नात भर पडली आहे.जिल्हा परिषदेच्या जम्बो भरती प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. आतापर्यंत ५० हजारांवर तरूणांनी जिल्ह्यात हजेरी लावली आहे. २८ तारखेपासून शहराकडे येणाऱ्या बसगाड्या प्रवाशांनी खचाखच भरून येत आहेत. यामध्ये सर्वाधिक प्रवासी हे परीक्षार्थी उमेदवार आहेत. परीक्षा घेताना सोपे जावे आणि विद्यार्थ्यांचा वाढता ताण आटोक्यात यावा म्हणून दुपारच्या सुमारास परीक्षा ठेवण्यात आल्या आहेत. यवतमाळसह पुसद, दिग्रस आणि आर्णी या केंद्रावरही परीक्षा घेतल्या जात आहेत. परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वी पोहोचता यावे म्हणून बाहेर जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थ्यांनी आदल्या दिवशीच जिल्हास्थळ गाठले. यातून शहरातील लॉज, हॉटेल्स, धर्मशाळा आणि फुटपाथही हाऊसफुल्ल झाले आहे. गत चार दिवसांपासून हाच अनुभव असल्याने व्यावसायिकांनी परीक्षा काळात आपल्या ‘लॉज’मधील रूमचे भाडे दुप्पट केले आहे. ज्या लॉजचे भाडे २०० ते ३०० रूपये आहे, अशा लॉजवर परीक्षेत गर्दी वाढल्याने ६०० ते ७०० रूपये आकारण्यात आले.परीक्षा काळात प्रत्येक हॉटेलचे दर वेगवेगळे होते. १२०० ते २५०० रूपयापर्यंतची रूम शहरात उपलब्ध होती. सुशिक्षित बेरोजगार तरूणांना नाईलाजाने हे दर चुकवावेच लागले. ज्यांची आर्थिक स्थिती हलाखीची होती, त्यांनी अक्षरश: बसस्थानकावर रात्र जागून काढली. अनेक तरूणांनी शहरातील वाढती गर्दी लक्षात घेत नातेवाईकाकडे मुक्काम करून पहाटे यवतमाळ गाठले. शहरातील कॅण्टीन, उपाहारगृहातही मोठी गर्दी होती. (शहर वार्ताहर)
हजारो परीक्षार्थ्यांच्या गर्दीने यवतमाळला महानगराचा लूक
By admin | Updated: December 3, 2015 02:44 IST