यवतमाळ : जिल्ह्याची वैशिष्ट्यपूर्ण बोली ज्येष्ठ कवी शंकर बडे यांनी जनमानसापर्यंत पोहोचविली. ही बोली आता चित्रपटाचा रूपेरी पडदाही काबीज करणार आहे. ‘अस्सा वऱ्हाडी माणूस’ या विनोदी प्रयोगाने राज्यभर परिचित असलेले शंकर बडे यांनी खास यवतमाळी बोलीमध्ये लावणी लिहिली असून ही लावणी ‘गजब हेराफेरी’ या चित्रपटात रसिकांच्या भेटीला येणार आहे. ‘हळूच लावा कडी राजसा घरात होईल हसा’ ही लावणी शंकर बडे यांनी रचली आहे. यवतमाळच्या जनजीवनातील वैशिष्ट्ये, माणसांच्या स्वभावातील निरनिराळ्या लकबी या लावणीमध्ये टिपण्यात आल्या आहे. आता या लावणीच्या माध्यमातून यवतमाळची बोली अख्या महाराष्ट्रातील रसिकांना भुरळ घालण्याच्या तयारीत आहे. लावणीला यवतमाळातीलच संगीत दिग्दर्शक बाबा चौधरी व डॉ.किशोर सोनटक्के यांनी संगीतबद्ध केले आहे. आशा भोसले, वैशाली सावंत, स्वप्नील बांदोडकर, श्रीधर फडके, संजीवनी भेलांडे, अशोक जाधव, सुरेश वाडकर, रवींद्र साठे अशा दिग्गजांचा स्वर लाभला आहे. या निमित्ताने यवतमाळ जिल्ह्याची बोली महाराष्ट्रभर पोहोचणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
यवतमाळची बोली रूपेरी पडद्यावर
By admin | Updated: September 26, 2015 02:34 IST