यवतमाळ : आपल्या घरात समृद्धी असताना दुसऱ्यांचे दु:ख पाहणे संवेदनशील माणसांना अशक्य होते. यवतमाळ जिल्ह्यात संवेदना जपणाऱ्यांची कमतरता नाही. म्हणूनच मेळघाटातील रहिवाशांकरिता येथील निवृत्त अभियंता मंडळाने आगळा उपक्रम हाती घेतला आहे. कपडे व इतर जीवनावश्यक वस्तू गोळा करून त्या वंचितांना देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, येत्या दिवाळीत ही ‘सस्नेह भेट’ देण्यात येणार आहे.मेळघाटात वास्तव्याला असणाऱ्या आदिवासी बांधवांना दिवाळीपूर्वी कपडे मिळावे म्हणून निवृत्त अभियंता मंडळाने पुढाकार घेतला आहे. त्यात त्यांना यश मिळाले आहे. एक हजार कपडे गोळा झाले आहे. दिवाळीपूर्वीच हे कपडे आदिवासी बांधवांच्या घरापर्यंत पोहोचणार आहे. वंचित बांधवांना दिवाळीच्या पर्वावर कपडे मिळावे आणि त्यांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी या उदात्त हेतूने निवृत्त अभियंता मंडळाने कपडे गोळा करण्याच्या कामाला सुरवात केली आहे. नवे अथवा कुटुंबातील जुने कपडे ही मंडळी स्वीकारत आहे. यासोबतच चप्पल, बुट आणि भांडेही गोळा करण्यात आले आहे. जमा करण्यात आलेले साहित्य १० आॅक्टोबरनंतर मेळघाटात पाठविले जाणार आहे. नागरवाडीच्या ग्रामस्थांना साहित्य वितरित केले जाणार आहे. निवृत्त अभियंता मंडळाच्या कार्यालयात सायंकाळी ६ ते ८ च्या सुमारास हे कपडे गोळा केले जातात. मंडळाचे अध्यक्ष गोपाळ भास्करवार, प्रकल्प प्रमुख लालसिंग अणे, शत्रुघ्न हनवते यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते कपडे, भांडे, आणि चप्पल बुट गोळा करण्याचे काम करीत आहे. (शहर वार्ताहर)
मेळघाटातील वंचितांसाठी यवतमाळकर सरसावले
By admin | Updated: September 28, 2015 02:43 IST