लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अतिवृष्टीचा फटका बसल्याने शेतकऱ्यांनी उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरविणे सुरू केले आहे. त्याचीच पुनरावृत्ती दोन दिवसांपूर्वी दुर्गम झरी तालुक्यात पहायला मिळाली.पाणी आहे पण वीज नाही म्हणून राळेगाव येथील शेतकऱ्याने चक्क आपली मोसंबीची बाग उद्ध्वस्त केली होती. त्यानंतर अतिवृष्टीमुळे सोयाबीन हातचा गेला म्हणून महागाव येथील शेतकऱ्याने शेतातील उभे सोयाबीन पेटविले होते. त्यानंतर नेर तालुक्यातील शेतकऱ्याने आधी अतिवृष्टी व आता अळ्यांच्या हल्ल्यामुळे कपाशीची बोंडे सडल्याने संपूर्ण कपाशीवर नांगर फिरविला होता. एका पाठोपाठ घडणाऱ्या या घटना कृषी खात्यासाठी धक्कादायक आहेत.
या घटनांची पुनरावृत्ती झरी तालुक्यात पहायला मिळाली. तीन दिवसांपूर्वी नारायण गोडे या शेतकऱ्याने बोंड अळीमुळे हिरव्या कंच कपाशीचे मातेरे झाल्याने तब्बल पाच एकरातील कपाशीची झाडे स्वत:च उपटून फेकली. यावरून एकूणच जिल्ह्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची काय अवस्था असेल याचा अंदाज येतो. यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टी, अळ्यांचा हल्या यामुळे शेतीचे संपूर्ण गणितच कोलमडल्याचे वारंवार घडणाऱ्या या घटनांवरून दिसून येते. या शेतकऱ्यांना आता शासकीय मदतीची आस आहे. शिवाय जिल्ह्यात घडणाऱ्या या घटनांची पुनरावृत्ती रोखण्याचे आवाहनही शासन व कृषी विभागापुढे आहे.