सर्वसाधारण सभा : टिप्पणीत चुका, स्वच्छता कंत्राटाला स्थगितीयवतमाळ : टिप्पणीतील अनेक चुका, निर्ढावलेले अधिकारी-कर्मचारी, घरकुलाचा अखर्चित निधी आणि मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यशैलीवरून नगरपरिषदेत गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी शहर विकास आघाडीच्या सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. बोलावूनही वेळेत कर्मचारी सभेला उत्तर देण्यासाठी येत नसल्याने या सभेत मुख्याधिकारी रवींद्र पांढरे यांचा जेष्ठा सदस्याने निषेध केला.नगराध्यक्षांच्या कक्षात झालेल्या सर्वसाधारण सभेत सुरवातीलाच तब्बल ५८ विषय असलेल्या जम्बो टिप्पणीमध्ये अनेक चुका आढळल्यात. त्यावरून सदस्यांनी चांगलीच आगपाखड केली. शहरातील विविध कामांच्या मुद्यावर सदस्यांनी मुख्याधिकारी रवींद्र पांढरे यांनाही धारेवर धरले. घरकुलाच्या अखर्चित निधीवरून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मागील तीन वर्षातील घरकुलाचा निधी अखर्चित राहिला. आता सीएसआर वाढल्याने बांधकामासाठी नगरपरिषदेला ३० ते ४० टक्के भुर्दंड सोसावा लागणार आहे. यावरून सदस्यांनी जाब विचारला. दरम्यान, २००६ मध्ये नगर अभियंता व झोन अभियंता यांची विधिमंडळ समितीने दलित वस्तीच्या निधीवरून चौकशी केली होती. त्याचा अहवाल मागविण्यात आला. यावेळी संबंधित झोन अभियंता मुख्याधिकाऱ्यांनी बोलवूनही सभागृहात वेळेत आला नाही. त्यामुळे ज्येष्ठ सदस्यांनी मुख्याधिकाऱ्याचाच जाहीर निषेध केला. झोन अभियंत्याला महिला सदस्याने तुम्ही फोन का उचलत नाही, असा प्रश्न केला. त्यावर अभियंत्याने भाऊंचे फोन नेहमीच घेतो, असे उत्तर दिले. याला महिला सदस्याने खडसावत सदस्य मी आहे, भाऊ नाही, असे सुनावले. त्यावेळेस सभागृहात हाशा पिकला. (कार्यालय प्रतिनिधी)
यवतमाळ नगरपरिषद सीओंचा निषेध
By admin | Updated: August 14, 2015 02:36 IST