हंसराज अहीर : गुरूवारीच झाले मंत्रिपद निश्चित, भाजपाचे आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते दिल्लीकडे रवानारवींद्र चांदेकर - वणीचंद्रपूर - वणी - आर्णी लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणारे खासदार हंसराज गंगाराम अहीर यांचा केंद्रीय मंत्रिमंडळातील समावेश निश्चित झाला आहे. त्यांच्या रूपाने स्वातंत्र्यानंतर यवतमाळ जिल्ह्याला प्रथम तर चंद्रपूर जिल्ह्याला दुसऱ्यांदा केंद्राचा लाल दिवा मिळणार आहे. मंगळवार ११ नोव्हेंबरला आपला ६0 वा वाढदिवस साजरा कणाऱ्या अहीर यांना केंद्रीय मंत्रिपदाची ही आगळीवेगळी भेट मिळणार आहे.खासदार अहीर यांचे वडील गंगाराम अहीर मलेरिया डॉक्टर होते. शासकीय सेवेत नियुक्ती झाल्याने ते चंद्रपूरलाच स्थायिक झाले. हंसराज अहीर तेथेच लहानाचे मोठे झाले. एल.टी.वाय.हायस्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाले. विद्यार्थी दशेपासूनच ते तत्कालीन जनसंघ आणि नंतर भाजपाशी जुळून होते. लोकांच्या समस्यांसाठी झटणारे नेतृत्व म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. कामगारांचे नेते म्हणून त्यांनी मान्यता मिळविली. याच लढाऊ बाण्याने भाजपातील धुरंधरांचे त्यांच्याकडे लक्ष गेले अन् १९९४ मध्ये ते सर्वप्रथम महाराष्ट्राच्या विधान परिषदेत निवडून गेले. तेव्हापासून त्यांनी कधीच मागे वळून बघितले नाही. लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेपूर्वी त्यांनी दोनदा चंद्रपूरचे खासदार म्हणून लोकसभेत आपला ठसा उमटविला. २00९ मध्ये लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर भाजपाने त्यांनाच नवीन चंद्रपूर-वणी-आर्णी मतदार संघातून उमेदवारी बहाल केली. या नवीन मतदार संघातूनही त्यांनी २00९ मध्ये काँग्रेसचे दिग्गज नरेंद्र पुगलिया यांना पराभूत करून विजयाची हॅट्ट्रिक साधली.नवीन मतदार संघामुळे गेल्या पाच वर्षांत वणी, पांढरकवडा, मारेगाव, झरीजामणी, घाटंजी, आर्णी आदी तालुक्यांसह यवतमाळ जिल्ह्यात त्यांनी संपर्क वाढविला. याच संपर्काच्या भरवशावर ते नुकत्याच झालेल्या निवडणुकीत प्रचंड मताधिक्क्याने विजयी झाले. त्यांच्या विजयात वणी आणि आर्णी-केळापूर विधानसभा मतदारसंघाचा मोलाचा वाटा आहे. गेल्या निवडणुकीत अहीर यांना पाच लाख आठ हजार ४९ एवढी मते मिळाली. प्रतिस्पर्धी काँग्रेसचे संजय देवतळे यांनी दोन लाख ७१ हजार ७८० मतांवर समाधान मानावे लागले होते. अहीर यांनी तब्बल दोन लाख ३६ हजार २६९ मतांनी विजय प्राप्त केला होता. यात वणी आणि आर्णी विधानसभा मतदार संघाने त्यांना अनुक्रमे ९२ हजार १०८ व एक लाख १० हजार ७४५ मते बहाल केली होती. वणी मतदार संघाने त्यांना काँग्रेस उमेदवारापेक्षा तब्बल ५३ हजार ८४८ तर आर्णी मतदारसंघानेही ५९ हजार ८१४ मतांची आघाडी दिली होती. अहीर दोन लाखांच्या फरकाने जिंकले होते. त्यात वणी आणि आर्णीचा तब्बल एक लाख १३ हजार ६६२ मतांचा वाटा होता. दोन लाख ३६ हजार २६९ मतांच्या फरकात चंद्रपूर जिल्ह्यापेक्षाही अहीर यांना यवतमाळ जिल्ह्यातील दोन मतदार संघानी मोलाची मदत केली होती. देशात २६ मे रोजी भाजपप्रणीत सरकार आले. अहीर यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार अशी चर्चा त्यावेळी जोरात होती. भाजप नेते नितीन गडकरी यांनी त्यांना तसा निरोपही दिला होता. मात्र ऐनवेळी त्यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली. तत्पूर्वी गडकरी यांनी अहीर यांना तसा निरोप देऊन पुढील विस्तारात नक्की सामावून घेतले जाईल, अशी ग्वाहीही दिली होती. आता रविवारी १० नोव्हेंबरला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. गुरुवारी ६ नोव्हेंबरला अहीर यांना पंतप्रधान कार्यालयातून दूरध्वनी आला होता. मंत्रिमंडळ विस्तारात समावेश होत असल्याने आपण १0 नोव्हेंबरला उपस्थित राहावे, असे त्यांना सांगण्यात आले होते. संदेश मिळताच शुक्रवार ७ नोव्हेंबरला हंसराज अहीर चंद्रपूर येथून दिल्लीकडे रवाना झाले.
यवतमाळला केंद्रात प्रथमच लाल दिवा
By admin | Updated: November 8, 2014 22:43 IST